दोन हजारची नोट असून अडचण, नसून खोळंबा
By Admin | Updated: November 13, 2016 00:44 IST2016-11-13T00:42:40+5:302016-11-13T00:44:52+5:30
तिसऱ्या दिवशीही गर्दी : सुट्टे पैसे मिळत नसल्याने नागरिकांच्या अडचणीत भर

दोन हजारची नोट असून अडचण, नसून खोळंबा
ओझर : केेंद्र शासनाने पाचशे व एक हजार रुपयांच्या नोटा रद्द करून तीन दिवस झाले. आता त्या बदल्यात मोठ्या नोटांपैकी दोन हजारच्या नोटा नागरिकांना मिळत आहेत. परंतु खुल्या बाजारात लहान नोटांची कमतरता असल्याने दोन हजारच्या नोटा म्हणजे असून अडचण, नसून खोळंबा आहे.
१०, २०, ५०, १०० च्या नोटांना मागणी वाढली असली तरी तेवढे सुट्टे देण्यास दुकानदार मात्र सकारात्मक नाही. कारण एखाद्याने शंभर किंवा दोनशेचे सामान घेतले आणि दोन हजारची नोट दिली तर त्याला सुटे देण्यासाठी नोटांची जुळवाजुळव करावी लागते. नेमक्या याच कारणामुळे अनेक दुकानदारांनी दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या तरी कुणीही दोन हजारच्या नोटा सध्या चलनात आणायला तयार नाही. बँकांमधून वितरित करण्यात आलेल्या शंभरपेक्षा लहान नोटा सामान्य माणसाला पुरत नसून बदलेल्या नोटांमधून रोजचा दैनंदिन खर्च कसा चालवायचा, हा प्रश्न सध्या भेडसावत आहे. तूर्तास बाजार पूर्णपणे ठप्प आहे. कारण ज्यांच्याकडे हातात दोन हजार आहे ते गर्भ श्रीमंत, तर शंभर वाले श्रीमंत अशीच परिस्थिती सध्या दिसून येत आहे.
ओझर टाऊनशिप : केंद्र शासनाने पाचशे व हजार रुपयांच्या नोटा चलनातून रद्द केल्याने शनिवारी तिसऱ्या दिवशीही नोटा बदलणे व खात्यावर जमा करण्यासाठी बँकांसमोर सकाळपासूनच नागरिकांच्या रांगा लागल्या होत्या. दरम्यान, एका बँकेत मात्र नोटा बदलून न देता खात्यावर जमा करण्यास सागिंतले जात होते रांगेत उभे राहिल्यानंतर नंबर लागण्यासाठी अडीच तास लागत होते.
ओझर टाऊनशिप वसाहतीत असलेल्या स्टेट बँक आॅफ इडिंया, आयसीआयसीआय, पंजाब नॅशनल बँक व बँक आॅफ महाराष्ट्रसमोर आज तिसऱ्या दिवशीही नोटा बदलून घेण्यासाठी रांगा होत्या. तर काहीजणांनी नोट्या आपल्या खात्यावर जमा केल्या. रांगेत असलेले सुरवातीचे नागरिक सोडल्यास नंतर रांगेत आलेल्यांना नोटा बदलणे किंवा खात्यात जमा करण्यासाठी कमीत कमी दोन तास वेळ लागत होता. बँक आॅफ महाराष्ट्रमध्ये नोटा बदलून दिल्या जात नव्हत्या. रांगेत आलेल्यांकडून फक्त खात्यात पाचशे व हजारांच्या नोटा जमा केल्या गेल्या. या सर्व व्यवहारासाठी आधार कार्ड, पॅन कार्डची झेरॉक्स केवायसी म्हणून सर्व बँकेत घेण्यात आले. याचा ज्येष्ठ नागरिकांना बराच त्रास झाला. (वार्ताहर)