हा बाबा सकाळी-सकाळी शपथ घेतो म्हणजे...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2020 17:35 IST2020-01-31T17:21:19+5:302020-01-31T17:35:45+5:30
अजित पवार यांची मिश्किली : शपथविधीची ‘ती’ आठवण झाली ताजी

हा बाबा सकाळी-सकाळी शपथ घेतो म्हणजे...
नाशिक : मी एवढ्या थंडीत सकाळी-सकाळी कार्यक्रमाला आलो. तुमची झोप मोडली. त्याबद्दल क्षमा मागतो. मी एवढ्या सकाळी कार्यक्रमाला येईल की नाही, याबाबत एकाने शंका व्यक्त केली. पण दुसरा त्याला म्हणाला,अरे हा बाबा सकाळी सकाळी शपथ घेतो, तेव्हा आपल्या कार्यक्रमाला येईलच, अशी मिश्किली राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील लखमापूर येथे शाळा इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना केली आणि उपस्थितांना फडणवीस-पवार यांनी भल्या पहाटे घेतलेल्या शपथविधीची आठवण पुन्हा ताजी झाली. कर्मवीर रा.स. वाघ संस्था संचलित कादवा इंग्लिश स्कूलच्या नवीन इमारतीचे उद्घाटन पवार यांच्या हस्ते झाले.
यावेळी पवार म्हणाले, शासनाने दोन लाख रूपयांपर्यंत पीक कर्ज माफीचा निर्णय घेतला आहे. त्यापेक्षा अधिक असलेले कर्ज माफ करण्यासंदर्भात होत असलेली मागणीही रास्त आहे. त्यासाठी शासनाने समिती नेमली असून नियमित कर्ज फेड करणाऱ्यांना प्रोत्साहन अनुदान व दोन लाखापेक्षा जास्त कर्ज असणाऱ्यांना दिलासा देण्याची योजना आखली जात आहे. मात्र, त्यात काही कर्ज रक्कम भरण्याची तयारी ठेवा, असे स्पष्ट करत सरसकट कर्जमाफी होणार नसल्याचेही त्यांनी संकेत दिले.
सरकार पूर्णवेळ टिकणार
तीन पक्ष जरी वेगळ्या विचारसरणीचे असले तरी राज्याच्या हितासाठी ते एकत्र आले असून हे जनतेचे सरकार आहे. ग्रामीण व शहरी दोन्ही क्षेत्राच्या विकासासाठी हे सरकार प्रयत्नशील आहे. मात्र काहीजण या सरकारबद्दल विसंवाद, वाद-विवाद असल्याच्या बातम्या पसरवत आहे, पण त्यात काहीही तथ्य नाही. शरद पवार, सोनिया गांधी व उद्धव ठाकरे हे सरकार टिकविण्यासाठी सक्षम असून हे सरकार कार्यकाळ पूर्ण करणार व जनतेच्या अपेक्षाही पूर्ण करणार, असे पवार यांनी ठासून सांगितले.