भारतनगरमधून अडीच लाख रुपयांची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2019 00:31 IST2019-03-16T00:00:31+5:302019-03-16T00:31:36+5:30
नाशिकरोड येथे एका खासगी फायनान्स कंपनीच्या शाखेत दहा तोळे सोने तारण ठेवून मिळालेली रोकड घरी घेऊन जात असताना भारतनगर येथे ओळखीतील संशयित आरोपीने गाडीतून अडीच लाख रुपयांची रक्कम चोरून नेल्याची घटना बुधवारी (दि.१३) घडली.

भारतनगरमधून अडीच लाख रुपयांची चोरी
नाशिक : नाशिकरोड येथे एका खासगी फायनान्स कंपनीच्या शाखेत दहा तोळे सोने तारण ठेवून मिळालेली रोकड घरी घेऊन जात असताना भारतनगर येथे ओळखीतील संशयित आरोपीने गाडीतून अडीच लाख रुपयांची रक्कम चोरून नेल्याची घटना बुधवारी (दि.१३) घडली.
सौभाग्यनगर येथील जिग्नेश विपीन व्होरा (३७) यांनी त्यांच्या पत्नीचे दहा तोळे सोन्याचे दागिने जेलरोड येथील एका खासगी फायनान्स संस्थेकडे तारण ठेवून मिळालेली अडीच लाख रुपयांची रक्कम घरी घेऊन जात असताना ही घटना घडली. दागिने तारण ठेवून परतताना जिग्नेश व्होरा यांना एका ओळखीच्या व्यक्तीने (संशयित आरोपी छोटू) भारतनगरपर्यंत गाडीतून सोडून देण्याची विनंती केली. त्यानंतर जिग्नेश व्होरा त्याला सोबत घेऊन जात असताना भारतनगर येथे धूम्रपान करण्यासाठी एका पानटपरीवर उतरले असता त्यांनी गाडीत ठेवलेले अडीच लाख रुपये संशयित आरोपीने चोरून नेले. या प्रकरणी जिग्नेश व्होरा यांच्या फिर्यादीवरून मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुरुवारी (दि.१४) गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहायक पोलीस उपनिरीक्षक एस. एच. वानखेडे या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.