जिल्हा बँकेच्या नुकसानीची आजी-माजी संचालकांवर जबाबदारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2022 01:28 IST2022-01-28T01:28:00+5:302022-01-28T01:28:19+5:30
नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सुमारे ३४७ कोटी रूपयांच्या नुकसानीची जबाबदारी निश्चित करण्याच्या प्रकरणाची चौकशी पूर्ण झाली असून, बँकेच्या आजी-माजी अध्यक्ष व संचालकांवर त्याची जबाबदारी निश्चित करण्यात येऊन तसा निष्कर्ष काढण्यात आला आहे. यात संचालक असलेल्या आजी माजी आमदारांचाही समावेश आहे गेल्या तीन ते चार वर्षापासून या संदर्भातील चौकशी सुरू होती. याबाबतचा अहवाल विभागीय सह निबंधकांना सोपविण्यात आला असून, दोषी ठरलेल्या आजी-माजी संचालकांना बँकेमार्फत आरोपपत्र बजावण्यात आले आहे.

जिल्हा बँकेच्या नुकसानीची आजी-माजी संचालकांवर जबाबदारी
नाशिक : नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सुमारे ३४७ कोटी रूपयांच्या नुकसानीची जबाबदारी निश्चित करण्याच्या प्रकरणाची चौकशी पूर्ण झाली असून, बँकेच्या आजी-माजी अध्यक्ष व संचालकांवर त्याची जबाबदारी निश्चित करण्यात येऊन तसा निष्कर्ष काढण्यात आला आहे. यात संचालक असलेल्या आजी माजी आमदारांचाही समावेश आहे गेल्या तीन ते चार वर्षापासून या संदर्भातील चौकशी सुरू होती. याबाबतचा अहवाल विभागीय सह निबंधकांना सोपविण्यात आला असून, दोषी ठरलेल्या आजी-माजी संचालकांना बँकेमार्फत आरोपपत्र बजावण्यात आले आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेची नवीन इमारत बांधण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करणे, त्याच बरोबर फर्निचर खरेदी, संगणक खरेदी यासह अवसायानात निघालेल्या संस्थांची पत न पाहता त्यांना अवाजवी कर्ज वाटप करणे, गरज नसताना नोकरभरती प्रकिया राबविणे या सारखे अनेक प्रकार गेल्या आठ ते दहा वर्षात जिल्हा बँकेत घडले. त्याविरुद्ध वेळोवेळी तक्रारी करण्यात येऊन सहकार विभागामार्फत प्रारंभी चौकशी करण्यात येऊन त्यात तथ्य आढळून आल्याने बँकेच्या झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या नुकसानीची जबाबदारी निश्चित करण्यासाठी कलम ८८ अन्वये सहायक निबंधकांकरवी चौकशी सुरू करण्यात आली होती. या चौकशीला आजी-माजी संचालकांनी हरकत घेत न्यायालयात आव्हान दिले होते. तथापि, न्यायालयाने चौकशीला परवानगी दिल्याने गेल्या तीन वर्षांपासून ही चौकशी सुरू होती. त्यात प्रत्येक आजी-माजी संचालकांचे जाब जबाब तसेच म्हणणे ऐकून घेण्यात येऊन त्याचा अंतिम निष्कर्ष काढण्यात आला आहे. तसा अहवालही विभागीय सह निबंधकांना पाठविण्यात आला असून, सुमारे ३४७ कोटी रुपयांचे संगनमताने नुकसान केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. या चौकशीच्या अहवालाची प्रत जिल्हा बँकेला पाठविण्यात आली असून, गुरुवारी (दि.२७) बँकेमार्फत सर्व दोषी संचालकांना आरोपपत्र बजावण्यात आले आहे.
चौकट====
हे आहेत दोषी संचालक
अद्वय प्रशांत हिरे, राघो काशीराम अहिरे, गणपत गंगाधर पाटील, शिरीषकुमार कोतवाल, अनिलकुमार आहेर, देवीदास पिंगळे, माणिकराव कोकाटे, दिलीप बनकर, राजेंद्र लक्ष्मण भोसले, नानासाहेब संपतराव सोनवणे, राजेंद्र डोखळे, वसंत निवृत्ती गिते, नरेंद्र भिकाजी दराडे, शोभा बच्छाव, डॉ. सुचेता बच्छाव, चंद्रकांत गोगड, वैशाली अनिल कदम, धनंजय मोतीराम पवार, जीवा पांडू गावित, माणिकराव बोरस्ते, संदीप गुळवे, परवेज कोकणी, माणिकराव माधवराव शिंदे, नानासाहेब दत्ताजी पाटील, दत्ता गायकवाड, प्रशांत हिरे यांचा समावेश आहे.