मुलीला पळवून नेल्याचा राग; ओझरला युवकाचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2022 22:54 IST2022-01-20T22:53:06+5:302022-01-20T22:54:06+5:30
ओझरटाऊनशिप : मुलीस पळवून नेल्याच्या संशयावरून मनात राग धरून मुलीच्या नातेवाइकांनी संगनमत करत घरासमोर राहणाऱ्या एका तरुणाच्या डोक्यात कोटा फरशीचा तुकडा मारून गंभीर जखमी करून जिवे ठार मारल्याची तक्रार ओझर पोलीस ठाण्यात दाखल झाली असून, पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

मुलीला पळवून नेल्याचा राग; ओझरला युवकाचा खून
ओझरटाऊनशिप : मुलीस पळवून नेल्याच्या संशयावरून मनात राग धरून मुलीच्या नातेवाइकांनी संगनमत करत घरासमोर राहणाऱ्या एका तरुणाच्या डोक्यात कोटा फरशीचा तुकडा मारून गंभीर जखमी करून जिवे ठार मारल्याची तक्रार ओझर पोलीस ठाण्यात दाखल झाली असून, पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
राहुल बाळू पिठे (२३), रा. भगतसिंग नगर, ओझर याने आपल्या मुलीस पळवून नेल्याचा संशय राहुल याच्या घरासमोर राहणाऱ्या मुलीच्या नातेवाइकांना आल्यामुळे त्याचा राग मनात धरून मुलीच्या नातेवाइकांनी संगनमत करत साईधाम रोडवरील यमुना नगर येथील राजेंद्र चोरडिया यांच्या बंद स्थितीत असलेल्या मॉलच्या आवारात राहुल पिठे याच्या डोक्यात कोटा फरशीचा तुकडा मारून त्यास जिवे ठार मारले. या बाबतची तक्रार राहुल पिठे याच्या वडिलांनी ओझर पोलीस ठाण्यात नोंदविली आहे. दरम्यान, अतिरिक्त पोलीस अधीक्षक माधुरी कांगणे, नाशिक ग्रामीणचे पोलीस उपअधीक्षक डॉ. अर्जुन भोसले यांनी घटनास्थळी भेट दिली. ओझर गुन्हे शोध पथक व स्थानिक गुन्हे शाखेची शोधपथके तयार करून खुनातील आरोपींच्या शोधार्थ रवाना करण्यात आली आहेत.
संशयितांवर कारवाईची मागणी
घटनेतील आरोपींना तत्काळ अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी आदिवासी शक्ती सेनेच्या वतीने पोलीस निरीक्षक अशोक रहाटे यांना निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी आदिवासी शक्ती सेनेचे संस्थापक अध्यक्ष अर्जुन गांगुर्डे, माजी पंचायत समिती सदस्य नितीन पवार, नितीन नाडे, सचिन शिंगाडे, अंबादास धोंगडे, शंकर लांडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.