सात राऊंड फायर करणारे चौघे पाठलाग करून ताब्यात
By दिनेश पाठक | Updated: May 17, 2024 22:06 IST2024-05-17T22:06:08+5:302024-05-17T22:06:43+5:30
गंगापूरगाव, जकात नाक्याजवळ पोलिसांनी आपल्या ताब्यातील वाहन आडवे करून कार थांबवून चौघांना ताब्यात घेण्यात आले.

सात राऊंड फायर करणारे चौघे पाठलाग करून ताब्यात
नाशिक (दिनेश पाठक): हरसुल पोलिस ठाणे हद्दीतील हॉटेलमध्ये बिल देण्याच्या कारणावरून वेटर व मालकावर दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने सात राऊंड फायर करणाऱ्या चार संशयितांना गंगापूर पोलिस ठाण्याच्या पथकाने पाठलाग करून पकडले. या चौघांवर अंबड (नाशिक), परभणी, नाशिक शहर या पोलिस ठाण्यांमध्ये विविध गुन्हे दाखल आहेत.
इम्रान अयनुर शेख (वय २५, रा. अंबड लिंकरोड, सातपूर), शेखर दिलीपराव कथले (२९, शिवाजीनगर, परभणी), अरबाज शब्बीर खान पठाण (२३, रा. हिग्रसवाडी सेलू, जि. परभणी), राहुल शाम क्षत्रिय (२४, रा. नांदुरनाका, नाशिक) यांना अटक करण्यात आली आहे. ग्रे रंगाची कार (एम.एच.२० सीए ९५९५) गिरणारे गावाकडून नाशिकच्या दिशेने येत असताना कारला अडविण्याचा प्रयत्न पाेलिसांनी केला. कारचालकाने इशारा देऊनही वाहन थांबविले नाही. संशय बळावल्याने पाेलिस पथकाने कारचा पाठलाग केला.
गंगापूरगाव, जकात नाक्याजवळ पोलिसांनी आपल्या ताब्यातील वाहन आडवे करून कार थांबवून चौघांना ताब्यात घेण्यात आले. त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडून एक गावठी कट्टा हस्तगत करण्यात आला. पोलिस हवालदार रवींद्र मोहिते, रमेश गोसावी, मच्छिंद्र वाकचौरे, विजय नवले यांनी ही कारवाई केली. तपास उपनिरीक्षक गणेश पाटील करीत आहेत.