आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण सध्या उत्तर महाराष्ट्राच्या झंझावाती दौऱ्यावर आहेत. नाशिकमध्ये माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी पक्षांतर्गत गोंधळ, तिकीट वाटपातील आरोप आणि विरोधकांच्या वचननाम्यावर सडेतोड भाष्य केले. "एबी फॉर्मबाबत जो काही प्रकार घडला आहे, तो गांभीर्याने घेतला असून दोषींवर कडक कारवाई केली जाईल," असा इशारा त्यांनी यावेळी दिला.
एबी फॉर्म गोंधळ आणि तिकीट विक्रीचे आरोप
निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये एबी फॉर्मवरून जो गोंधळ उडाला, त्यावर चव्हाण यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. "अशा घटना भाजपमध्ये पहिल्यांदाच घडत आहेत, हे चुकीचे आहे. मी स्वतः या प्रकरणाची चौकशी करत असून लवकरच ठोस निर्णय घेतला जाईल," असे ते म्हणाले. तसेच, भाजपमध्ये तिकीट विक्री होत असल्याच्या आरोपांचे त्यांनी खंडन केले. "भाजप हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे, इथे असे कधीच होत नाही. आरोप करणाऱ्यांची समजूत काढली जाईल, पण अशा चर्चांमध्ये तथ्य नाही," असे त्यांनी स्पष्ट केले.
राजूमामा भोळे यांच्या पुत्राचा विषय आणि पक्षाची भूमिका
जळगावचे आमदार राजूमामा भोळे यांच्या पुत्राच्या उमेदवारीबाबत बोलताना चव्हाण म्हणाले की, "२९ पालिकेचे निर्णय घेताना काही गोष्टी अल्पावधीत ठरल्या होत्या. ही प्रक्रिया बॉडी निर्णय प्रक्रियेत होती, कदाचित कार्यकर्त्यांपर्यंत माहिती पोहोचली नसेल किंवा नजरचुकीने काही गोष्टी घडल्या असतील. मात्र, पक्षाची शिस्त महत्त्वाची असून, निवडून आले तरी त्यांना महत्त्वाच्या पदावर जाता येणार नाही," असे संकेत त्यांनी दिले.
ठाकरेंचा वचननामा आणि दत्तक नाशिक
उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलेल्या वचननाम्यावर टीका करताना चव्हाण म्हणाले, "भाजप जे शब्द देते ते पूर्ण करते, पण ठाकरेंचे जाहीरनामे फक्त कागदावरच राहतात." नाशिक दत्तक घेण्याच्या जुन्या घोषणेवरून होणाऱ्या टीकेला उत्तर देताना त्यांनी देवेंद्र फडणवीस यांची पाठराखण केली. "देवेंद्रजींनी व्हिजन ठेवून नाशिकसाठी ताकदीने काम केले आहे. विरोधकही खासगीत त्यांचे कौतुक करतात. स्वतः फडणवीस नाशिकच्या सभेत येतील आणि आम्ही नाशिकसाठी काय केले व काय करणार, याचा हिशोब मांडतील," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
'१०० प्लस'चा नारा आणि महायुतीचा महापौर
नाशिकच्या विकासासाठी आणि वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी भाजप कटिबद्ध असल्याचे सांगत त्यांनी '१०० प्लस' जागांचा विश्वास व्यक्त केला. "नाशिकसह सर्वच ठिकाणी महायुतीचे महापौर होतील आणि नाशिकमध्ये भाजपचाच महापौर बसवण्यासाठी आम्ही पूर्ण ताकद लावणार आहोत," असेही रवींद्र चव्हाण यांनी ठामपणे सांगितले.
Web Summary : Ravindra Chavan criticized Thackeray's manifestos as empty promises during his Nashik visit. He addressed internal BJP issues, promising action on ticket allocation irregularities. Chavan defended Fadnavis's work in Nashik and expressed confidence in a BJP mayor.
Web Summary : रवींद्र चव्हाण ने नासिक दौरे के दौरान ठाकरे के घोषणापत्रों को खोखले वादे बताया। उन्होंने भाजपा के आंतरिक मुद्दों को संबोधित करते हुए टिकट आवंटन अनियमितताओं पर कार्रवाई का वादा किया। चव्हाण ने नासिक में फडणवीस के काम का बचाव किया और भाजपा महापौर में विश्वास जताया।