शिक्षकांचे ‘पेन्शन बचाव, टेन्शन हटाव’
By Admin | Updated: September 13, 2015 23:40 IST2015-09-13T23:40:21+5:302015-09-13T23:40:51+5:30
आंदोलनराज्यभर वणवा पेटणार : निवृत्तिवेतन योजनेची मागणी

शिक्षकांचे ‘पेन्शन बचाव, टेन्शन हटाव’
पेठ : नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत रूजू झालेल्या प्राथमिक शिक्षकांना शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने नियमित निवृत्तिवेतन योजना नाकारत अंशदायी पेन्शन योजना लागू केल्याने संतापलेल्या राज्यातील लाखो शिक्षकांनी आता थेट सरकारच्या विरोधात ‘पेन्शन बचाव, टेन्शन हटाव’चा नारा पुकारला असून संपूर्ण राज्यभर विविध माध्यमातून आंदोलने छेडून पेन्शन योजना पदरात पाडून घेण्यासाठी तालुकानिहाय कृती समित्यांची स्थापना करण्यात आली आहे़
शासनाने नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत आलेल्या शिक्षकांच्या वेतनातून दहा टक्के रक्कम कापून त्यात तेवढीच रक्कम शासनाच्या वतीने टाकून निवृत्तीनंतर पेन्शन देण्याची अंशदायी पेन्शन योजना लागू केली आहे़
याबाबत अनेकवेळा मागणी करूनही शासनाने ही योजना बंद केली नाही़ त्यातच अनेक शिक्षकांच्या रकमा वेतनातून कापून घेतल्या; मात्र त्याचा तालुका व जिल्हा पातळीवर कोणताही हिशेब दिला जात नसल्याने संतापलेल्या शिक्षकांनी आता राज्यभर लढा देण्याचा निर्णय घेतला
आहे़
याचाच एक भाग म्हणून पेठ येथे कृती समितीची बैठक घेण्यात
आली़ यापुढील काळात निवेदने, मोर्चे, आंदोलने किंवा उपोषणासारखी हत्यारे वापरून शासनाकडून जुनी पेन्शन योजना पदरात पाडून घेण्यासाठी राज्यभर आंदोलनाची ठिणगी पडण्याची शक्यता असून यापुढील काळात हे पेन्शन आंदोलन किती रंग दाखवते ते दिसून येईल़ (वार्ताहर)