Tadipar gangster was handcuffed for murder | खुनाच्या गुन्ह्यातील तडीपार गुंडाला ठोकल्या बेड्या

खुनाच्या गुन्ह्यातील तडीपार गुंडाला ठोकल्या बेड्या

 नाशिक : खून, खुनाचा प्रयत्न, जबरी लूट, हाणामाऱ्यांसारखे पंचवटी पोलीस ठाण्यात तब्बल अठरा ते वीस गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेला क्रांतिनगरमधील सराईत गुन्हेगार तुकाराम दत्तू चोथवे (२९,रा.पोटिंदे चाळ, क्रांतिनगर पंचवटी) यास सातपूर पोलिसांनी सातपूर-अंबड लिंकरोडवरील चौफुलीवर शिताफीने बेड्या ठोकल्या. चोथवे यास दोन वर्षांकरिता शहर पोलीस उपायुक्तांनी शहरासह ग्रामीण भागातून तडीपार केले होते. 
तडीपारीचा आदेश झुगारून कोणत्याही वरिष्ठ अधिकाऱ्यांची पूर्वपरवानगी न घेता, सर्रासपणे शहरात वावरणारा सराईत गुन्हेगार चोथवे हा सातपूर-अंबड लिंकरोडवरील चौफुलीवर येणार असल्याची गोपनीय माहिती पोलीस नाईक आव्हाड यांना मिळाली. यानुसार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर मोरे यांच्या आदेशान्वये सहायक निरीक्षक नागरे यांच्या पथकाने चौफुलीवर रात्रीच्या सुमारास सापळा रचला. मिळालेल्या माहितीनुसार चोथवे हा येथील कार मॉलजवळ आला असता, दबा धरून असलेल्या पोलिसांनी त्यास शिताफीने ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी व झाडाझडती केली असता, त्याच्याजवळ कुठल्याही प्रकारचे शस्त्र आढळून आले नाही. त्यास दोन वर्षांकरिता शहरासह जिल्ह्यातून तडीपार करण्यात आल्याची खात्री पटली. पोलिसांनी त्याबाबत माहिती घेतली असता, पंचवटी पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध विविध प्रकारचे गंभीर गुन्हे मोठ्या संख्येने दाखल असल्याचे समजले. 
पोलिसांनी त्यास अटक केले आहे. गेल्या काही दिवसापासून शहरातील गुन्हागांराविरोधात पोलिसांनी मोहिम सुरू केली आहे. 

Web Title: Tadipar gangster was handcuffed for murder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.