उड्डाणपुल कामामुळे केलेली भाडेवाढ स्थगित करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2018 17:39 IST2018-10-12T17:38:49+5:302018-10-12T17:39:23+5:30
मालेगाव : येथील नवीन बसस्थानका जवळील जुना आग्रारोडवर उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. या कामामुळे मालेगाव व राज्यातील इतर आगाराच्या बसेसच्या वाहतूक टप्प्यामध्ये वाढ झाल्याने पंधरा रुपयांची भाडेवाढ करण्यात आली आहे

उड्डाणपुल कामामुळे केलेली भाडेवाढ स्थगित करा
मालेगाव : येथील नवीन बसस्थानका जवळील जुना आग्रारोडवर उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. या कामामुळे मालेगाव व राज्यातील इतर आगाराच्या बसेसच्या वाहतूक टप्प्यामध्ये वाढ झाल्याने पंधरा रुपयांची भाडेवाढ करण्यात आली आहे. सदर भाडेवाढ ही अन्यायकारक असल्याची बाब शालेय विद्यार्थी व प्रवाशांनी ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर शुक्रवारी येथील शासकीय विश्रामगृहावर पोलीस, महापालिका प्रशासन व राज्य परिववहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत जुनाआग्रारोडवर अवजड वाहनांना प्रवेशबंदी करुन बसेस पूर्ववत मार्गाने सोडाव्यात व भाडेवाढ कमी करण्याच्या सूचना ग्रामविकास राज्यमंत्री भुसे यांनी दिल्या आहेत.
जुनाआग्ररोडवर उड्डानपुलाचे काम सुरू असल्याने धुळे बाजुकडून येणाºया बसेस मनमाड चौफुली मार्गे मालेगावात येत असतात तसेच नाशिककडे जाणाºया बसेस येथील जुना बसस्थानकावर उभ्या राहतात यात सात ते आठ किलो मीटरचा वाढीव फेरा पडत असल्याचा दावा परिवहन महामंडळाच्या अधिकाºयांनी करीत १ आॅक्टोबर पासून पंधरा रुपयांची भाडेवाढ केली आहे. तालुक्यातील झोडगे व इतर गावांच्या प्रवाशांनाही आर्थिक फटका बसत आहे. याची तक्रार ग्रामविकास राज्यमंत्र्यांकडे प्रवाशांनी केल्यानंतर तातडीची आढावा बैठक घेण्यात आली. राज्यातील पंधरा जिल्ह्यातील प्रवाशांना पंधरा रुपये भाडेवाढीचा भुर्दंड बसत आहे. हा आर्थिक त्रास कमी करावा, जुना आग्रारोडवर टोल नाका उभारुन अवजड वाहने रोखावीत केवळ बसेसला यामार्गावरुन प्रवेश द्यावा या ठिकाणी पोलीस कर्मचारी नेमावेत याची तातडीने अंमलबजावणी करुन भाडेवाढ कमी करावी अशा सूचना ग्रामविकास राज्यमंत्री भुसे यांनी केल्या आहेत. बैठकीला पोलीस उपअधीक्षक अजित हगवणे, रत्नाकर नवले, आगार प्रमुख के. बी. धनवटे, मनपा उपायुक्त नितीन कापडणीस, वाहतूक शाखेच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक तृष्णा गोपनारायण, रामा मिस्तरी, प्रमोद शुक्ला, भरत देवरे, कल्पेश ब्राम्हणकर आदि उपस्थित होते.