आश्चर्यम : म्हणे, बिबट्याने केल्या वीसपेक्षा अधिक कोंबड्या फस्त
By Admin | Updated: April 24, 2017 14:38 IST2017-04-24T14:38:16+5:302017-04-24T14:38:16+5:30
एक वर्षापेक्षा अधिक वयाचा बिबट्या एका वेळेस केवळ दोन ते अडीच किलो खाद्य खाऊ शकतो.

आश्चर्यम : म्हणे, बिबट्याने केल्या वीसपेक्षा अधिक कोंबड्या फस्त
अझहर शेख / नाशिक : एक वर्षापेक्षा अधिक वयाचा बिबट्या एका वेळेस केवळ दोन ते अडीच किलो खाद्य खाऊ शकतो. यापेक्षा अधिक खाद्य नैसर्गिकदृष्टया तो खात नसल्याचा निष्कर्ष वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी अभ्यासानंतर काढला आहे; मात्र नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यात घडलेल्या एका घटनेत बिबट्याने चक्क वीसपेक्षा अधिक कोंबड्या फस्त केल्याची चर्चा रंगल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. वस्तुस्थिती वेगळीच असून कोंबड्यांच्या खुराड्यामधील दोन ते तीन कोंबड्या बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झाल्या तर एक लहान बोकडाच्या मानेला दुखापत झाल्याचे निरिक्षणात आढळल्याचे वनअधिकाऱ्यांनी सांगितले.
बिबट्या हा मार्जार कुळामधील ‘अभिमन्यू’ म्हणून ओळखला जातो. त्याची शिकार करण्याची आणि ते शिकार वापरण्याची पध्दत अन्य वन्यप्राण्यांपेक्षा जरा हटके आहे. बिबट्याने एकावेळी केलेली शिकार तो अनेकदा खातो. जोपर्यंत त्याची शिकारीचे खाद्य संपुष्टात येत नाही, तोपर्यंत शक्यतो बिबट्या अधिवास सोडून शिकारीसाठी भटकंती करत नसल्याचे वनविभागाच्या सुत्रांचे म्हणणे आहे. एकदा शिकार केल्यानंतर बिबट्या ती शिकार पुरवून-पुरवून खातो. जंगलामध्ये वावरणारा बिबट्या हा पुर्ण वाढ झालेला असल्यास तो पाच किलोपेक्षा अधिक खाद्य एकावेळी खाऊ शकतो; मात्र जंगलाबाहेर डोंगर,किंवा उसशेतीच्या परिसरात वावरणारा बिबट्या एकावेळी दोन किलोपेक्षा अधिक खाद्य खात नाही.

- सुनील वाडेकर, रेस्क्यू पथक प्रमुख तथा वनपरिक्षेत्र अधिकारी