सिन्नर शहर-उपनगरांना दिवसाआड पाणीपुरवठा करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2020 22:28 IST2020-04-07T22:27:59+5:302020-04-07T22:28:19+5:30
सिन्नर शहर व लगतच्या उपनगरांना दिवसाआड पाणीपुरवठा करावा अशी मागणी महाराष्ट्र ग्राहक पंचायत नाशिकच्या सिन्नर शाखेने केली आहे. तशा आशयाचे निवेदन सिन्नर नगर परिषदेचे मुख्याधिकारी संजय केदार यांना ईमेलद्वारे देण्यात आले.

सिन्नर शहर-उपनगरांना दिवसाआड पाणीपुरवठा करा
सिन्नर : सिन्नर शहर व लगतच्या उपनगरांना दिवसाआड पाणीपुरवठा करावा अशी मागणी महाराष्ट्र ग्राहक पंचायत नाशिकच्या सिन्नर शाखेने केली आहे. तशा आशयाचे निवेदन सिन्नर नगर परिषदेचे मुख्याधिकारी संजय केदार यांना ईमेलद्वारे देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, सिन्नर शहर व लगतच्या उपनगरातील लोकसंख्या वाढत आहे, त्या प्रमाणात नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध होत नाहीत. पाणीपुरवठा हा सर्वांचा जिव्हाळ्याचा तसेच ज्वलंत प्रश्न आहे. सध्या शहरात दोन दिवसाआड तर उपनगरात तीन-चार दिवसांआड पाणीपुरवठा केला जातो. सर्वांनाच सारखीच पाणीपट्टी आहे. मग असा भेदभाव का? असा प्रश्न नागरिक करताना दिसत आहेत. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तसेच लॉकडाउनमुळे सर्वच माणसं घरातच तळ ठोकून आहेत. सर्वच कामकाज व दैनंदिन जीवनचक्र ठप्प झाले आहे.
कडवा धरणात पाण्याचा पुरेसा साठा असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व लॉकडाउन, संचारबंदीच्या काळात रोज नाहीतर कमीतकमी दिवसाआड पाणीपुरवठा करावा अशी आग्रही मागणी करण्यात आली आहे. निवेदनावर दत्ता शेळके, श्यामसुंदर झळके, विश्वनाथ शिरोळे व इतर पदाधिकारी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
कोरोना विरुद्धच्या लढाईत शासन, पोलीस, आरोग्य व इतर सर्व प्रशासकीय यंत्रणा, सेवाभावी संस्था सतर्क झाल्या असून डॉक्टर, नर्सेस, आरोग्य कर्मचारी, पोलीस तसेच सफाई कामगार जीव धोक्यात घालून अहोरात्र काम करीत आहे. त्यांच्या कार्याची प्रशंसा केलीच पाहिजे. कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी घरातच सुरक्षित राहणे व स्वत:बरोबर कुटुंबाची काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. त्यासाठी मास्क, सॅनिटायझर तसेच वारंवार साबणाने हात स्वच्छ करणे, यामुळे अतिरिक्त पाण्याचा वापर दुपटीने वाढला आहे.