विद्यार्थ्यांचे हाल, पालकांना मनस्ताप
By Admin | Updated: August 6, 2015 00:04 IST2015-08-06T00:04:25+5:302015-08-06T00:04:25+5:30
निर्बंधाचा अतिरेक : पूर्वसूचना न देता वाहतुकीच्या फेरबदलामुळे संस्थाचालकही नाराज

विद्यार्थ्यांचे हाल, पालकांना मनस्ताप
नाशिक : कुंभमेळा तोंडावर असल्याने पोलिसांनी वाहतूक मार्गांवर निर्बंध घालण्याची जी घाई चालवली आहे त्यामुळे शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. पाल्यांप्रती संवेदनशील असणाऱ्या पालकांचा या निर्बंधामुळे विद्यार्थी शाळेत पोहोचला किंवा नाही याची खातरजमा होईपर्यंत जीव टांगणीला राहतो. त्यामुळे कुंभमेळ्यासाठी काहीही नियोजन करा; परंतु किमान ते आगाऊ जाहीर करा आणि संस्थाचालकांना त्याची कल्पना द्या, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
कुंभमेळ्याच्या निमित्ताने पोलिसांनी साधुग्रामकडील मार्गांवर आत्तापासूनच निर्बंध घातले आहेत. वास्तविक १९ तारखेला साधुग्राममध्ये, विविध आखाड्यांमध्ये होणाऱ्या ध्वजारोहणाचा आणि शहरातील अन्य भागांचा संबंध नाही. तथापि, सध्या पोलीस खात्याने कुठेही वाहतुकीस निर्बंध घालण्याचा जो अतिरेक चालविला आहे, तो बघता पर्वणी दूरच परंतु शहरात कधीही, कुठेही वाहतुकीस मनाई केली जात आहे. औरंगाबाद नाक्यावरील वाहतूक बंदीमुळे साऱ्याच नागरिकांना वेठीस धरले जात आहे. या भागात असलेल्या शिक्षण संस्थांमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांचे अतिशय हाल होत आहेत. आता पर्वणी काळातही आणखी कडक (?) नाकाबंदी करण्याचे घाटत आहे. मुळाच पंचवटीत कुंभमेळा होत असल्याने या भागात वाहतुकीवर निर्बंध घातले गेले तर फक्त या भागातील शाळा- महाविद्यालयांना त्याचा त्रास होतो असे नाही, आता पंचवटीतील विद्यार्थी कॉलेजरोडच्या शाळा-कॉलेजमध्ये प्रवेश घेतो किंवा सातपूरमधील विद्यार्थी पंचवटी परिसरातील शाळा-महाविद्यालयांत प्रवेश घेऊ शकतो. त्यामुळे एका भागात निर्बंध घातले गेले तरी त्याचा त्रास अन्य शिक्षण संस्थांमध्ये शिकणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांवर होत असतो. त्यामुळे आता पोलिसांनी नियोजन काहीही करावे, परंतु आधी नागरिकांना त्याची पूर्वकल्पना द्यावी, त्यांना विश्वासात घ्यावे, असे मत शिक्षण संस्थाचालकांनी व्यक्त केले.