Student riot hour due to lack of teacher | शिक्षकच नसल्याने विद्यार्थ्यांचा दंगामस्तीचा तास
शिक्षकच नसल्याने विद्यार्थ्यांचा दंगामस्तीचा तास

ठळक मुद्दे शाळेत मुलांची पटसंख्या ६० इतकी आहे . याठिकाणी लवकरात लवकर शिक्षक नियुक्त करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

येवला : तालुक्यातील दुगलगावच्या कृष्णावाडी येथे जिल्हा परिषदेच्या वस्तीशाळेवर शाळा उघडल्यापासून शिक्षकच नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे ग्रामस्थांसह पालक वर्गात नाराजी व्यक्त केली जात आहे. शिक्षकांची बदली केल्यामुळे याठिकाणी अशी परिस्थिती ओढवली आहे.
शाळा सुरू होऊन चार दिवस उलटले तरीही दुगलगावच्या कृष्णवाडी शाळेवर एकही शिक्षक नाही. या शाळेला दुगलगावचे सरपंच विश्वनाथ सूर्यभान मोरे, उपसरपंच अशोक अंबादास लासुरे, शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष सखाहरी पुंडलिक मोरे, मनसेचे जिल्हा सरचिटणीस रामदास लासुरे, पालक शंकर मनोहर वाघ आदींनी भेट दिली असता शाळेत शिक्षक नसल्याने मुले शाळेच्या बाहेर दंगा मस्ती करताना आढळून आले. या वस्तीशाळेवर एक ते सहा वर्ग आहेत. या ठिकाणी पूर्वी तीन शिक्षकांची नेमणूक होती. त्यानंतर दोन शिक्षक कार्यरत राहिले. त्यांचीही बदली झाल्याने या शाळेला आता कोणीही वाली उरला नाही. त्यामुळे मोबाईल शिक्षक प्रवीण मंडाळकर यांना पंचायत समितीचे शिक्षणाधिकारी मनोहर वाघमारे यांनी मुलांना शिकविण्यासाठी पाठविले. शाळेत मुलांची पटसंख्या ६० इतकी आहे . याठिकाणी लवकरात लवकर शिक्षक नियुक्त करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. अन्यथा शाळेला कुलूप ठोकून आंदोलनाचा इशारा दिला आहे.


Web Title: Student riot hour due to lack of teacher
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.