...अखेर जुन्या नाशकात कठोर अंमलबजावणी सुरू !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2020 17:14 IST2020-07-16T17:12:40+5:302020-07-16T17:14:09+5:30
कडेकोटपणे बॅरिकेडिंग करत भद्रकाली पोलिसांनी काटेकोरपणे बंदोबस्त वाढवून जुने नाशिक भागात केवळ मेडिकल, दवाखाने, भाजीपाला विक्रीच्या दुकानांना व्यवसायाची परवानगी देत अन्य सर्व प्रकारची दुकाने बंद केले. या भागात चोख गस्त वाढविण्यात आली.

...अखेर जुन्या नाशकात कठोर अंमलबजावणी सुरू !
नाशिक : जुने नाशिकला प्रतिबंधित क्षेत्र काही दिवसांपुर्वी घोषित करण्यात आले; जेणेकरून या भागात पुन्हा हाताबाहेर स्थिती जावू नये आणि नागरिकांमध्ये खबरदारीचे गांभीर्य निर्माण व्हावे; मात्र सुरूवातीला केवळ रस्तेबंदी करण्यात आली होती अन्य कुठल्याही नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी होताना दिसत नव्हती. याबाबत ‘लोकमत’ने सचित्र वृत्त देत लक्ष वेधले. यानंतर मनपा, पोलीस प्रशासनाने सतर्क होत कठोरपणे प्रतिबंधित क्षेत्राच्या नियमांची अंमलबजावणी करण्यास गुरूवारी (दि.१६) या भागात प्रारंभ केला.
मागील काही दिवसांपासून जुन्या नाशकात कोरोनाबाधित रूग्ण मोठ्या संख्येने आढळून येत होते; आता या भागात रूग्णांची संख्या कमी झाली असली तरी काही भागात अधूनमधुन रूग्ण मिळून येतच आहे. जुन्या नाशकात कोरोनाबाधित रूग्णांचा यापुर्वी झालेला मृत्यूचा आकडाही गंभीर आहे. प्रचंड दाट लोकवस्ती निरक्षरतेचे अधिक प्रमाण आणि पारंपरिक विचारांचा पगडा यामुळे या संमिश्र समाजाच्या लोकसंख्या असलेल्या गावठाण भागात कोरोनाबाबत जनजागृती व नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करताना पोलीस व महापालिका प्रशासनाची दमछाक झाली. सुरूवातील नाईकवाडीपुरा, कुंभारवाडा, बागवानपुरा, चव्हाटा, चौकमंडई, बुधवार पेठ, वडाळानाका, कथडा अशा सर्वच भागांमध्ये कोरोनाबाधित रूग्णांची संख्या वाढली होती. यामुळे महापालिकेच्या आरोग्यविभागाला युध्दपातळीवर या भागात प्रयत्न करावे लागले. काही दिवसांपासून या भागात रूग्ण आढळून येण्याचे प्रमाण कमी झाल्याचे मनपाच्या ‘डॅशबोर्ड’वरून स्पष्ट होत असले तरीदेखील खबरदारी घेणे तितकेच गरजेचे आहे. यामुळे या भागाला प्रतिबंधित क्षेत्र म्हणून काही दिवसांसाठी जाहीर केले गेले. कडेकोटपणे बॅरिकेडिंग करत भद्रकाली पोलिसांनी काटेकोरपणे बंदोबस्त वाढवून जुने नाशिक भागात केवळ मेडिकल, दवाखाने, भाजीपाला विक्रीच्या दुकानांना व्यवसायाची परवानगी देत अन्य सर्व प्रकारची दुकाने बंद केले. या भागात चोख गस्त वाढविण्यात आली.
व्यवहार थांबले; रस्त्यांवर शुकशुकाट
जुने नाशिक भागातील सर्व दैनंदिन व्यवहार यापुर्वी सुरळीत होते, त्यामुळे प्रतिबंधित क्षेत्र केवळ कागदावरच की काय? असा प्रश्न चौहोबाजूंनी उपस्थित केला जात होता. यामुळे महापालिका व पोलीस प्रशासनाने संयुक्तपणे कारवाई करत या भागातील सर्व व्यवहार थांबविले. याचा फायदा असा झाला की रस्त्यांवर आपोआपच शुकशुकाट पसरलेला गुरूवारी दिसून आला. अत्यावश्यक सेवेची दुकानांवर मात्र कोणतेही ‘निर्बंध’ नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
नाकाबंदी कठोर; टवाळखोरांवर कारवाई हवी
जुने नाशिक भागात टवाळखोर टारगट तरूण ठिकठिकाणी घोळक्याने गल्लीबोळात बसलेले दिसून येतात. तसेच मोबाईलवर एकत्र गेम खेळत ‘डिस्टन्स’, मास्कची खबरदारी घेतली जात नसल्याने त्यांच्यावर पोलिसांनी कारवाई करण्याची मागणी होत आहे.