शेतकरी संघटनेच्या वतीने रास्ता रोको
By Admin | Updated: December 7, 2015 23:12 IST2015-12-07T23:11:19+5:302015-12-07T23:12:04+5:30
शेतकरी संघटनेच्या वतीने रास्ता रोको

शेतकरी संघटनेच्या वतीने रास्ता रोको
न्यायडोंगरी : नांदगाव तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने सोमवारी (दि. ७) न्यायडोंगरी येथील सावरगाव चौफुली (नाना चौक), राज्य क्र मांक २४ वर रास्ता रोको आंदोलन करण्यात आल्याने काहीकाळ संपूर्ण वाहतूक खोळंबून दुतर्फा वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
दुधाला रास्त भाव मिळावा, गुरांचे खाद्य असलेल्या सरकी पेंडीचे साठेबाजी बंद करावी, कांद्याचे निर्यातशुल्क शून्य करण्यात यावे, एप्रिल महिन्यात झालेल्या गारपिटीची नुकसानभरपाई त्वरित मिळावी, माणिकपुंज धरणातील पाणी नदीपात्र व पाटाद्वारे सोडून शेतकऱ्यांना व पिण्यासाठी उपलब्ध करून द्यावे, अशा विविध मागण्यांसाठी नांदगाव तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष नीलेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी या ठिकाणी रास्ता रोको केले. सोमवार न्यायडोंगरी येथील आठवडे बाजाराचा दिवस असल्याने याप्रसंगी प्रचंड गर्दी झाली होती. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून नांदगावचे पोलीस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे यांच्यासह प्रचंड फौजफाटा तैनात असल्याने आंदोलन शांततेत पार पडले. यावेळी शासनाच्या वतीने नायब तहसीलदार वाघ व पोलीस निरीक्षक ठोंबे यांना लेखी निवेदन देण्यात आले
या आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते निवृत्ती खालकर, अशोक जाधव, तेजस बोरसे, दत्तात्रय जाधव, विलास घोटेकर, सुरेश जाधव, किरण लगडे, बालाजी निस्ताने, तुकाराम निस्ताने, दीपक शेलार आदि कार्यकर्ते उपस्थित होते. सुमारे एक तास चालू असलेल्या या आंदोलनामुळे खोळंबलेली वाहतूक पोलिसांच्या मदतीने सुरळीत करण्यात आल्यानंतर प्रवाशांनी व वाहनचालकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. (वार्ताहर)
मनमाड : कांद्याला सरासरी ११५0 रुपये भाव
मनमाड : कांदाभावात गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या घसरणीमुळे शेतकरी वर्गात संतापाचे वातावरण आहे. मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज आठशे ट्रॅक्टर कांद्याची आवक झाली. बाजार समितीमध्ये कांद्याला किमान ७00 व कमाल १५00 रुपये प्रतिक्विंटल तर सरासरी ११५0 रुपये प्रतिक्विंटल बाजारभाव मिळाला. या वर्षी पावसाने दगा दिल्याने त्याचा परिणाम कांद्याच्या उत्पादनावर झाला आहे. एकरी उत्पादन घटल्याने बाजारभाव वाढल्यानंतरही शेतकर्याचे आर्थिक नियोजन कोलमडले होते. सध्या झालेल्या बाजारभावातील घसरणीमुळे शेतकर्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. कांद्याबरोबरच भाजीपाल्याच्या उत्पादनातही घट झाली आहे. ज्या शेतकर्यांकडे थोड्याफार प्रमाणात पाणी आहे त्यांनी भाजीपाल्याची लागवड केली आहे. येत्या उन्हाळ्यात पाणीटंचाई तीव्र होणार असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.