आंदोलनात सहभागी ट्रकचालकांचा टर्मिनलमध्ये मुक्काम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2018 00:17 IST2018-07-22T00:16:52+5:302018-07-22T00:17:11+5:30
डिझेल दरवाढ, न परवडणारी आणि असहनीय टोल आकारणी, तृतीय पक्ष विमा हप्त्यात न परवडणारी असहनीय आणि अपारदर्शक वाढ, ट्रान्सपोर्ट व्यवसायाला टीडीएस आकारणी आणि न परवडणारी ई-वे बिल प्रणालीविरोधात मालवाहतूकदारांनी पुकारलेला संपाच्या दुसऱ्या दिवशीही नाशिकच्या आडगाव, चेहडी व विल्होळी येथील ट्रक टर्मिनलमध्ये हजारो मालवाहू वाहने उभी करण्यात आली आहेत.

आंदोलनात सहभागी ट्रकचालकांचा टर्मिनलमध्ये मुक्काम
नाशिक : डिझेल दरवाढ, न परवडणारी आणि असहनीय टोल आकारणी, तृतीय पक्ष विमा हप्त्यात न परवडणारी असहनीय आणि अपारदर्शक वाढ, ट्रान्सपोर्ट व्यवसायाला टीडीएस आकारणी आणि न परवडणारी ई-वे बिल प्रणालीविरोधात मालवाहतूकदारांनी पुकारलेला संपाच्या दुसऱ्या दिवशीही नाशिकच्या आडगाव, चेहडी व विल्होळी येथील ट्रक टर्मिनलमध्ये हजारो मालवाहू वाहने उभी करण्यात आली आहेत. संपकाळात वाहनांचे व मालाचे नुकसान टाळण्यासाठी ट्रकचालकांनीही येथेच मुक्काम ठोकला आहे. आॅल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट काँग्रेसकडून शुक्रवारपासून (दि.२०) देशभरात चक्काजाम आंदोलनाला सुरुवात झाली आहे. या आंदोलनाला नाशिक जिल्ह्यातील ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याने जिल्हाभरात सुमारे १२ हजारांहून अधिक मालवाहतूक करण्याºया वाहणांची चाके थांबली आहे. जिल्हाभरातील १५०० हून अधिक ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांनी या संपात सहभाग घेतला आहे.
व्यावसायिकांकडून ट्रकचालकांची व्यवस्था
मालवाहतूकदारांच्या संपामुळे ट्रकचालकांनी मालाची वाहतूक पूर्णपणे थांबविली आहे. त्यांच्यासाठी आडगाव ट्रक टर्मिनल, विल्होळी ट्रक टर्मिनल व चेहडी नाका येथे गाड्या उभ्या करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच आडगाव ट्रक टर्मिनल येथे ट्रकचालकांसाठी नाशिकमधील विविध वाहतूकदार संघटनांतर्फे वाहनचालकांच्या भोजनाची सेवाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. जिल्ह्यातील इतर ठिकाणी नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या संलग्न असलेल्या व्यावसायिकांकडून ट्रकचालकांची व्यवस्था करण्यात आली आहे.