स्थायी समिती सभापती भाजपाकडूनच खिंडीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2018 01:38 IST2018-12-15T01:38:28+5:302018-12-15T01:38:48+5:30
महापालिकेत स्थायी समिती सभापती हिमगौरी आडके विरुद्ध इतर पदाधिकारी, असा सामना आता सुरू झाला आहे. महापौर चषक स्पर्धा आयोजनाची तयारी आडके यांनी तयार केली असताना महापौर रंजना भानसी यांनी या स्पर्धाच रद्द केल्या आहेत.

स्थायी समिती सभापती भाजपाकडूनच खिंडीत
नाशिक : महापालिकेत स्थायी समिती सभापती हिमगौरी आडके विरुद्ध इतर पदाधिकारी, असा सामना आता सुरू झाला आहे. महापौर चषक स्पर्धा आयोजनाची तयारी आडके यांनी तयार केली असताना महापौर रंजना भानसी यांनी या स्पर्धाच रद्द केल्या आहेत. त्याचप्रमाणे समितीच्या २२ नोव्हेंबर रोजी झालेल्या बैठकीतील ठराव प्रशासनाकडे सादर न झाल्याने समितीचे सदस्य आणि सभागृहनेता दिनकर पाटील यांनी नगरसचिवांना पत्र दिले असून, संबंधित व्यक्तीलाच जबाबदार धरण्याची मागणी केली आहे.
महापालिकेत भाजपामध्ये सुंदोपसुंदी वाढू लागली आहे. महापालिकेचे माजी आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या विरोधात अन्य पदाधिकारी असताना स्थायी समितीच्या सभापती हिमगौरी आडके या मात्र समर्थनाच्या भूमिकेत होत्या. त्यावरून सुरू झालेली खदखद कायम आहे. किंबहूना आकाशवाणी केंद्राजवळील भूखंडापोटी २१ कोटी रुपये देण्याची जी भूमिका तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी घेतली होती, तीच भूमिका कायम ठेवत हिमगौरी आडके यांनी संबंधितांना मोबदला अदा करू दिला, असा याच समितीचे सदस्य दिनकर पाटील यांचा आक्षेप आहे. त्यावरून एकमेकांना आव्हान देण्याची भाषा केली जात असताना आता दिनकर पाटील यांनी स्थायी समितीत झालेल्या ठरावांच्या प्रती पंधरा दिवसांच्या आत नगरसचिव विभागाकडे जाणे बंधनकारक असताना प्रत्यक्षात तसे घडले नाही.