धार्मिक पर्यटनासाठी एसटीच्या योजना
By Admin | Updated: August 6, 2015 00:02 IST2015-08-06T00:01:45+5:302015-08-06T00:02:16+5:30
१०० रुपयांत नाशिक-त्र्यंबक : ८५० रुपयांत वणी, शिर्डी, भीमाशंकर

धार्मिक पर्यटनासाठी एसटीच्या योजना
नाशिक : पर्वणी काळात एका दिवसासाठी १०० रुपये शुल्क भरून पर्वणी पास उपलब्ध असून, दिवसभर नाशिक, त्र्यंबक शहरांतर्गत ठिकाणी तिकीट न काढता भाविकांना प्रवास करता येईल. त्याशिवाय नाशिक, शिर्डी, सप्तशृंगीगड, भीमाशंकर आदि ठिकाणी जाण्यासाठी ८४७ रु पये भरून चार दिवस प्रवासाचा पासदेखील दिला जाणार आहे. राज्यातील सर्व बसस्थानकांवर हे पास प्रवाशांना उपलब्ध होणार असल्याचे विभाग नियंत्रक यामिनी जोशी यांनी सांगितले.
अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या नाशिक-त्र्यंबकेश्वर येथील कुंभमेळ्याची तयारी आता जवळपास पूर्ण झाली आहे. तीन हजार बसेस त्यासाठी सहा हजारपेक्षा अधिक चालक-वाहक, आपत्कालीन परिस्थितीतील दुरुस्ती यंत्रणा, नूतनीकरण केलेली बसस्थानके, प्रवाशांच्या माहितीसाठी अद्ययावत ‘माहिती कक्ष’, नाममात्र दरात ‘पर्वणी पासेस’ अशा विविध सुविधा एस.टी.ने उपलब्ध करून दिल्या आहेत.
एस.टी.च्या माध्यमातून प्रवाशांना अधिक चांगली सुविधा मिळावी यासाठी तीन हजार बसेसचे नियोजन करण्यात आले असून, या बसेसकरिता सहा हजारपेक्षा अधिक वाहक-चालक, पर्यवेक्षक, कर्मचारी नेमण्यात येणार आहेत. पर्वणीकाळात प्रत्येक बस दर ८ ते १० तासांत स्वच्छ होईल यावरही महामंडळाचा विशेष भर राहणार असून, हरित कुंभाची संकल्पना ध्यानात घेऊन बसस्थानकांच्या स्वच्छतेवरही लक्ष केंद्रित केले आहे. प्रत्येक बाह्य वाहनतळावर बस दुरु स्तीची कार्यशाळा आवश्यक त्या यंत्रांसह कार्यान्वित केली जाणार असून, याच ठिकाणी कर्मचाऱ्यांना विश्रांती कक्ष, शुद्ध पाणी, स्वच्छतेच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. नाशिकरोड आगाराचे काम पूर्ण झाले असून, महामार्ग बसस्थानकाचे तसेच त्र्यंबकेश्वर येथील जव्हार फाटा बसस्थानकाचेही नूतनीकरण केले आहे. सात बसस्थानकांवर कायमस्वरुपी सीसीटीव्ही लावले आहेत. (प्रतिनिधी)