फरार कंटेनरचालकाच्या शोधासाठी पथक रवाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2021 00:24 IST2021-11-01T00:24:03+5:302021-11-01T00:24:45+5:30
लासलगाव बस आगाराचे चालक संदीप मांगो निकम यांच्या अपघाती मृत्यूस कारणीभूत असलेला कंटेनरचालक फरार असून तो उत्तर प्रदेशातील असल्याने त्याच्या शोधासाठी पोलिसांचे पथक रवाना झाले असल्याची माहिती लासलगावचे सहायक पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांनी दिली आहे.

फरार कंटेनरचालकाच्या शोधासाठी पथक रवाना
लासलगाव : लासलगाव बस आगाराचे चालक संदीप मांगो निकम यांच्या अपघाती मृत्यूस कारणीभूत असलेला कंटेनरचालक फरार असून तो उत्तर प्रदेशातील असल्याने त्याच्या शोधासाठी पोलिसांचे पथक रवाना झाले असल्याची माहिती लासलगावचे सहायक पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांनी दिली आहे. शनिवारी (दि.३०) लासलगाव आगाराची लासलगाव-तुळजापूर ही बस आगाराबाहेर पडत असताना समोरून येणाऱ्या कंटेनरने बसला पाठीमागून कट मारला होता. त्याबाबत जाब विचारण्यास गेलेल्या बसचालक संदीप मांगो निकम यांच्यावरच कंटेनर घालत त्यांना चिरडले होते. त्यात निकम यांचा मृत्यू झाला होता. अपघातानंतर कंटेनर चालक फरार झाला होता. दरम्यान, पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली असून सदर कंटेनर चालक हा उत्तर प्रदेशातील रहिवासी आहे. सदर कंटेनरवर तो पंधरा दिवसांपूर्वीच चालक म्हणून कामाला लागला होता. या चालकाच्या शोधासाठी लासलगावचे पोलीस पथक रवाना झाले आहे. दरम्यान, या अपघातप्रकरणी राज्य परिवहन महामंडळाने वकिलाची नियुक्ती केली आहे. दरम्यान, लासलगाव बस आगाराची बससेवा रविवारी पूर्ववत झाली. दिवसभरात १३६ फेऱ्या करण्यात आल्या.