सिन्नर : शिवजन्मोत्सव सोहळ्या-निमित्त येथील आडवा फाटा मैदानावर आयोजित केलेल्या सिन्नर कला व क्रीडामहोत्सवास मंगळवारी सकाळी उत्साहात प्रारंभ झाला. दोन दिवस चालणाऱ्या या महोत्सवात तालुकाभरातून शेकडो स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने मैदान खेळाडूंनी फुलून गेल्याचे चित्र होते.शिवसरस्वती फाउण्डेशन व राष्टÑवादी कॉँग्रेस यांच्या वतीने शिवजयंतीनिमित्त आमदार चषक २०२० व सिन्नर रन कला-क्रीडा दोनदिवसीय महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा परिषद सदस्य सीमंतिनी कोकाटे यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष विठ्ठल उगले, माजी जिल्हा परिषद सदस्य अॅड. राजेंद्र चव्हाणके, नगरसेवक शीतल कानडी, वासंती देशमुख, मल्लू पाबळे, डॉ. विष्णू अत्रे, नामदेव कोतवाल, दत्ता वायचळे, पंकज जाधव, बाजीराव बोडके, सोमनाथ भिसे, सुनील गवळी, राजाराम मुरकुटे उपस्थित होते.क्रीडामहोत्सवात कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉल, रांगोळी, नृत्य, चित्रकला, कुस्ती व सिन्नर रन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. तालुकाभरातील विविध शाळांचे शेकडो स्पर्धक विविध क्रीडा प्रकारात सहभागी झाले होते. मुलींच्या कुस्ती स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. प्रत्येक क्रीडा प्रकारात आपले नैपुण्य दाखविण्यासाठी खेळाडू मेहनत घेत होते. प्रत्येक स्पर्धेत विजेत्यांना आकर्षक रोख बक्षिसे देण्यात येणार आहेत.बुधवारी (दि. १९) सायंकाळी सहा वाजता आडवा फाटा मैदानावर पिंगा ग पोरी पिंगा फेम वैशाली म्हात्रे यांच्या गीतांची सुरेल मैफल आयोजित करण्यात आली आहे. यावेळी विजेत्यांना पारितोषिक वितरण करण्यात येणार आहे.
सिन्नरला शिवजयंतीनिमित्त क्रीडामहोत्सवास प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2020 00:59 IST