ठळक मुद्देमुख्य संशयित ताब्यात : सुरगाणा पोलिसांची कारवाई
सुरगाणा : गुन्हे शाखा व सुरगाणा पोलीस यांनी केलेल्या संयुक्त कारवाईतून घाटमाथ्यावरील युवकाच्या खूनप्रकरणी मुख्य संशयित आरोपीस पकडण्यात यश मिळाले आहे. घटनेच्या रात्री रोटी येथे वरातीत मयत व संशयित हे डीजेवर नाचताना तसेच नाचणाऱ्यांच्या गर्दीतून बाहेर पडतानाचा व्हिडिओ एकाच्या मोबाइलमध्ये पोलीस कर्मचारी गोतुरणे यांना तपास करताना दिसून आल्याने संशयिताला ताब्यात घेण्यात यश मिळाले.
१ मार्च रोजी घाटमाथ्यावरील रोटी फाट्याजवळ वांजुळपाडा येथील युवक राजेंद्र ढवळू बागुल याचा मृतदेह आढळून आला होता. रोटी येथे वरातीत नाचण्याच्या किरकोळ कारणावरून हत्येचा प्रकार घडल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. ग्रामीण अपर पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली या घटनेचा पोलीस तपास सुरू असताना सुरगाणा तालुक्यातील राजभुवन येथील मधुकर उर्फ चम्या गंगाराम राऊळ (२७) याचे नाव समोर आले. शोध सुरू असताना मधुकर उर्फ चम्या हा सटाणा तालुक्यातील तळवाडे दिगर येथे मिळून आला.
त्याला विश्वासात घेऊन अधिक चौकशी केली असता त्याने सांगितले की २८ फेब्रुवारी रोजी तो व त्याचे दाजी हे दोघे रोटी येथे वरातीत नाचण्यासाठी गेले होते. यावेळी वरातीत नाचण्यावरून आमचा राजू उर्फ राजेंद्र ढवळू बागुल रा.वांजुळपाडा याचेशी वाद झाला होता. म्हणून मी दुचाकीवर राजेंद्र यास बसवून गाळपाडा येथे दारू पिण्यासाठी बहाणा करून घेऊन गेलो.
गाळपाडा येथून परत येताना रोटीपाडा फाटा येथे मी त्यास दगडाने मारहाण करून नालीत पाडून त्याचे डोक्यात मोठा दगड घालून त्यास ठार मारले असल्याची कबुली दिली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
एक संशयित ताब्यात
दोन दिवसात या गुन्ह्याची उकल करण्यासाठी गुन्हे शाखेचे एपीआय वाघ, एएसआय मुंढे, महाले, तुपलोंढे, खांडवी, चालक म्हसदे तसेच सुरगाणा येथील पोलिस निरीक्षक दिवानसिंग वसावे, सहायक पोलिस उपनिरीक्षक निलेश बोडखे, गोतुरणे, गवळी आदींनी केलेल्या तपासात यश मिळाले असून याप्रकरणी आणखी एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.
Web Title: Solve the crime of murder of a youth from the video of dancing in the show
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.