वलखेड-ननाशी रस्ता रूतला मातीत
By Admin | Updated: May 5, 2014 20:09 IST2014-05-05T19:26:12+5:302014-05-05T20:09:47+5:30
सदस्य संगीता ढगे यांचा उपोषणाचा इशारा

वलखेड-ननाशी रस्ता रूतला मातीत
सदस्य संगीता ढगे यांचा उपोषणाचा इशारा
नाशिक : ननाशी ते वलखेड या सुमारे दहा किलोमीटर रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामात अनेक ठिकाणी निकृष्ट दर्जाचे काम झाले असून, त्यामुळे या रस्त्यावरून वाहतूक करणार्या ७० ते ८० गावांतील वाहनचालकांना जीव मुठीत धरूनच प्रवास करावा लागत आहे. या रस्त्याच्या कामाची चौैकशी न झाल्यास उपोषणाचा इशारा जिल्हा परिषद सदस्य संगीता राजेंद्र ढगे यांनी दिला आहे.
यासंदर्भात पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याकडे रस्त्याच्या कामाची तक्रार करण्यात येणार असल्याचेही संगीता ढगे यांनी सांगितले. वलखेड-ननाशी हा रस्ता तालुक्यातील प्रमुख रस्ता असून निगडोळ, पाडे, नळवाडपाडा, वणी खुर्द, ठेपणपाडा, नळवाडी, ननाशी, जोरण आदि प्रमुख गावांना हा रस्ता जोडणारा आहे. तसेच ननाशीमार्गे सुरगाण्याला जोडणाराही हाच रस्ता असल्याने या रस्त्यावरून दिंडोरी व सुरगाणा तालुक्यांतील ७० ते ८० गावातील लोक दररोज प्रवास करतात. अनेक वर्षांपासून या रस्त्याची दुरवस्था झाली असून, रस्ता दुरुस्तीसह साईडप्यांच्या कामांसाठी सार्वजनिक बांधकाममंत्री तथा पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याकडे नागरिकांनी मागणी केल्याने त्यांनी या रस्त्यासाठी निधी मंजुर केला. रस्ता दुरुस्तीच्या कामाला सुरुवात झाली, मात्र बाजूने रस्ता मजबुतीकरणासाठी आवश्यक ते दगड व मुरूम न वापरता कडेला खोदलेली मातीच त्यावर टाकण्यात आल्याने या रस्त्यावरून येणारी व जाणारी वाहने कडेला खोदलेल्या व मातीने बुजविलेल्या रस्त्याच्या मधोमध रूतत असल्याचे अनेक प्रकार घडत आहेत. त्यामुळे या रस्त्याच्या कामाचा दर्जा राखण्यात दिंडोरी सार्वजनिक बांधकाम विभाग अयशस्वी ठरला आहे. त्यामुळे या कामाची अधीक्षक अभियंता व गुणवत्ता नियंत्रण विभागाने चौकशी करावी, या मागणीसाठी आपण उपोषण करणार असल्याचे संगीता राजेंद्र ढगे यांनी सांगितले.(प्रतिनिधी)