धुक्याचा द्राक्षबागा, पिकांना फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2019 00:21 IST2019-12-22T22:15:14+5:302019-12-23T00:21:22+5:30
येवला तालुक्यात आठ दिवसांपासून सकाळी धुके, दवं आणि दिवसभर ढगाळ वातावरण असल्यामुळे द्राक्षबागेवर डावणी, भुरी, अळीचा प्रादुर्भाव वाढल्याने तसेच कांदा पिकही करपा, मावाच्या विळख्यात सापडल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.

जळगाव नेऊर परिसरातील करपाग्रस्त कांद्याचे पीक.
जळगाव नेऊर : येवला तालुक्यात आठ दिवसांपासून सकाळी धुके, दवं आणि दिवसभर ढगाळ वातावरण असल्यामुळे द्राक्षबागेवर डावणी, भुरी, अळीचा प्रादुर्भाव वाढल्याने तसेच कांदा पिकही करपा, मावाच्या विळख्यात सापडल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.
सध्या शेतकर्यांची द्राक्ष बागेची डिपिंग, थिनिंग आदी कामे शेवटच्या टप्प्यात असल्याने व बहुतेक कामे आटोपल्याने शेतकरी आता ढगाळ वातावरणाने धास्तावले आहे. थंडीने द्राक्ष बागेच्या मण्यांना तडे जात असुन अहोरात्र मेहनत घेऊन शेतकर्यांवर संकटावर संकट येत असल्याने शेतकरी चिंतातुर झाले आहेत. तसेच द्राक्षबागेला औषधे, बुरशीनाशके, कीटकनाशके यांचे अति प्रमाणात झाल्याने निर्यातक्षम द्राक्षबागेला अडचणी निर्माण होत आहेत.
पहाटे दवं आणि धुके पडत असल्याने द्राक्ष बागेला शेकोटीचा आधार देत आहेत. भरमसाठ झालेला खर्चही वसूल होतो की नाही त्यामुळे द्राक्ष उत्पादक चिंतातुर झाल्याचे चित्र दिसत आहे.
शेतकर्यांचे नगदी पीक म्हणून कांदा पिकाकडे बघितले जाते. पण त्यावरही करपा, मावा रोड आणि तुडतुड्यांनी आक्रमण केले आहे. औषधांची फवारणी करुनही कांदा पिकाची वाढ होत नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे.
द्राक्षबागेच्या छाटणीपासून सुरू झालेली संकटांची मालिका सुरूच आहे. पीक हाती येते की नाही याची शाश्वती राहिलेली नाही. सुरुवातीलाच पावसामुळे घडामध्ये पन्नास टक्के कुज झाल्याने उरल्यासुरल्या द्राक्षबागेवरही ढगाळ वातावरणामुळे भुरी, डावणी रोगाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने द्राक्षबागा वाचविण्यासाठी प्रयत्न करीत असताना मोठा खर्च होत असल्याचे जळगाव नेऊर येथील द्राक्ष उत्पादक बाबासाहेब शिंदे यांनी सांगितले. तर सततच्या ढगाळ वातावरणामुळे कांदे पिकावर करपा येऊन कांदे पिकास हानी पोहोचली आहे. औषधांचा खर्च भरमसाठ होत असून, त्याचा उत्पादनावर विपरीत परिणाम होणार आहे, असे जऊळके येथील कांदा उत्पादक संतोष सोनवणे म्हणाले.