Six people drowned in Valdevi dam, one girl died | वालदेवी धरणात सहा जण बुडाले, एका मुलीचा मृत्यू

वालदेवी धरणात सहा जण बुडाले, एका मुलीचा मृत्यू

ठळक मुद्देतिघे बचावले : बचाव पथकाकडून अन्य पाच जणांचा शोध सुरू

नाशिक : एकीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी वालदेवी धरणावर गेलेल्या शहरातील सिंहस्थनगर, मोरवाडी, सिडको परिसरातील ९ जणांपैकी ६ जण पाण्यात बुडाल्याची दुदैवी व धक्कादायक घटना शुक्रवारी (दि.१६) सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली आहे. त्यातील एका मुलीचा मृतदेह हाती लागला असून, अन्य पाच जणांचा शोध रात्री उशिरापर्यंत सुरू होता. या घटनेत सुदैवाने तिघे बचावले आहेत. 
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील सिंहस्थनगर, मोरवाडी, वंजारभवन, पाथर्डीफाटा परिसरातील हिंमत चौधरी (१६), समाधान वाकळे,  प्रदीप जाधव, सना वजीर मणीयार (१६) आरती भालेराव (२२),  नाजीया वजीर मणीयार 
(१९), खुशी वजीर मणीयार (१०),  ज्योती गमे (१६) व सोनी गमे (१२)  हे सर्व १० ते २२ वयोगटांतील मुले-मुली सोनी गमे हिचा वाढदिवस साजरा करण्यासाठी वालदेवी धरण परिसरात शुक्रवारी दुपारी गेले होते. त्यांनी सोबत केकही नेला होता. यावेळी से‌ल्फी काढण्याच्या नादात एकाचा पाय घसरल्याने पाण्यात पडला
 मात्र, त्यातील आरती भालेराव, हिंमत चौधरी, नाजीया मणीयार, खुशी मणीयार, ज्योती गमे व सोनी गमे हे सहा जण पाण्याचा अंदाज  न आल्याने बुडाले, तर समाधान वाकळे व  प्रदीप जाधव रा.सिंहस्थनगर, सेंट लॉरेन्स शाळेजवळ आणि सना नजीर मणीयार रा. टोयाटो शोरूममागे, पाथर्डीफाटा हे तिघे जण सुदैवाने बचावले. 
या घटनेची माहिती पोलिसांना कळाल्यानंतर वाडीवऱ्हे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विश्वजीत जाधव हे आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. 
त्यांनी तातडीने बचाव कार्य सुरू केले. यावेळी पाण्यातून आरती भालेराव हिचा मृतदेह बाहेर काढण्यात  आला, तर अन्य पाच जणांचा रात्री उशिरापर्यंत शोध सुरू होता. याच वेळी ग्रामीण पोलीस अधीक्षक सचिन पाटील, अपर पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, उपविभागीय अधिकारी अर्जुन भोसले, 
तहसीलदार परमेश्वर कासुळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी 
केली. बचाव कार्यात स्वत: पोलीस निरीक्षक विश्वजीत जाधव यांचेसह पोलीस उपनिरीक्षक नितीन पाटील व सहकारी कर्मचारी सोनवणे, नवले, मराठे, चौधरी सहभागी झाले आहेत. 
सेल्फीने केला घात
धरणांतील पाण्याजवळ सेल्फी काढण्याचा धोका जीवावर बेतण्याची घटना घडली आहे. ज्या मुलीचा वाढदिवस होता, ती सोनी गमे हीही पाण्यात बुडाली असून, तिच्यासोबत तिची बहीण ज्योती गमे हीही आहे. याशिवाय मणीयार कुटुंबातील दोघी बहिणींचा समावेश आहे. दरम्यान, रात्रीच्या अंधारामुळे बचाव कार्यात अडथळे निर्माण होत होते. रात्री उशिराने आरसीपी पथकालाही पाचारण करण्यात आले होते.
वाढदिवस बेतला जिवावर
कोरोनामुळे सर्वत्र हॉटेल, तसेच अन्य ठिकाणे बंद असल्याने वाढदिवस साजरा करण्यासाठी थेट वालदेवी नदीवर गेलेल्या मित्र- मैत्रिणींच्या वाढदिवस जिवावर बेतला. यात हिंमत चौधरी हा एकुलता एक मुलगा बेपत्ता झाला असून, त्याचादेखील शोध पोलीस घेत आहेत. या घटनेने  सिंहस्थनगर परिसरात  शोककळा पसरली होती. दरम्यान, रिक्षाचालकामुळे नऊ जणांपैकी तीन जणांना बाहेर काढण्यात यश आले. दरम्यान, अंधारात शोधकार्यात अडथळे येत असल्याने रात्री उशिरा शोधकार्य थांबविण्यात आले. शनिवारी सकाळी पुन्हा शोध घेण्यात येणार आहे.

Web Title: Six people drowned in Valdevi dam, one girl died

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.