सिन्नरला धाडसी चोरी
By Admin | Updated: February 7, 2017 01:30 IST2017-02-07T01:30:03+5:302017-02-07T01:30:20+5:30
गुन्हा : टायर दुकानातून साडेसात लाखांचा मुद्देमाल लंपास

सिन्नरला धाडसी चोरी
सिन्नर : नाशिक-पुणे महामार्गावर एस. जी. टॉवरमधील सिन्नर टायर्समध्ये अज्ञात चोरट्यांनी धाडसी चोरी केली. ट्रक, जीप व अन्य वाहनांचे ९० टायर्स आणि ट्यूब व रोख रकमेसह सुमारे सात लाख ६८ हजार ५४४ रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला. याप्रकरणी सिन्नर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. नाशिक-पुणे महामार्गावर सिन्नर कॉलेजजवळ एस. जी. टॉवर असून, या व्यापारी संकुलात सिन्नर टायर्स नावाने कैलास क्षत्रिय व मनोज गुंजाळ यांच्या मालकीचे टायर्स व ट्यूब विक्रीचे दुकान आहे. रविवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी टायर दुकानाच्या शटरचे सेंटर लॉक व कड्याच्या पट्ट्या तोडून दुकानात प्रवेश केला. चोरट्यांनी तोंडाला रुमाल बांधलेला होता. हातमोजे घातलेल्या चोरट्यांनी रात्री अडीच वाजेच्या सुमारास दुकानात प्रवेश केल्यानंतर सुरुवातीला सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची दिशा बदलली. त्यानंतर चोरट्यांनी दुकानाबाहेर लावलेल्या वाहनात टायर वाहून नेले. चोरट्यांनी सुमारे अर्धा तासात दुकानातील ट्रक, जीप, ट्रॅक्टर, कार आदि वाहनांचे विविध कंपन्यांचे ९० टायर्स व ट्यूब चोरून नेले. त्याचबरोबर गल्ल्यातील रोख २५ हजार ९०० रुपये चोरटे घेऊन गेले. चोरटे तरुण व चौघे असल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसून आले. सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास शेजारील हॉटेल शबरीच्या सुरक्षारक्षकाने शटर उघडे असल्याचे व बाहेर लाईट बंद असल्याचे पाहिल्याने त्याला चोरी झाल्याचा संशय आला. त्याने तातडीने फोन करून घटनेची माहिती दिली. घटनास्थळी श्वान पथक व ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले होते. मात्र चोरट्यांनी वाहनातून टायर नेल्याने श्वानाने फारसा माग काढला नाही. दुकानाचे संचालक मनोज गुंजाळ यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात चोरट्यांच्या विरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक निसार सय्यद, हवालदार रमेश निकम, भगवान शिंदे, शहाजी शिंदे, सचिन गवळी अधिक तपास करीत आहेत. (वार्ताहर)