Sinnar Politics ( Marathi News ) : राजकीयदृष्ट्या संवेदनशील समजला जाणारा सिन्नर तालुका नाशिक जिल्ह्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू बनू पाहत आहे. गेल्या सहा महिन्यांपूर्वी नाशिकला खासदार देण्याची किमया करणाऱ्या सिन्नरकरांना महायुतीच्या सरकारमध्ये माणिकराव कोकाटे यांच्या रूपाने कॅबिनेट मंत्रिपद लाभले आहे. १९९५ च्या मंत्रिमंडळात स्व. तुकाराम दिघोळे यांच्या रूपाने सिन्नरला राज्यमंत्रिपद मिळाले होते. त्यानंतर सुमारे २९ वर्षांनंतर सिन्नरला मंत्रिपद लाभले आहे.
सिन्नरच्या इतिहासात पहिल्यांदाच कॅबिनेट मंत्रिपद मिळाल्याने सिन्नरकरांनी आनंद व्यक्त केला आहे. सिन्नरकरांनी खासदार निवडून देताना पक्षीय मतभेद बाजूला सारून उद्धवसेनेच्या राजाभाऊ वाजे यांना प्रचंड मताधिक्य दिले होते. त्याची धास्ती नाशिक जिल्ह्याने घेतली होती. लोकसभा निवडणुकीत सिन्नरकरांनी वाजे यांना दिलेली आघाडी निकालासाठी निर्णायक ठरली होती. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला प्रचंड मताधिक्य मिळाल्याने विधानसभा निवडणुकीत काय निकाल लागतो, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. मात्र, माणिकराव कोकाटे यांनी विधानसभा निवडणुकीत ४१ हजारांचे मताधिक्य मिळवून व्यक्तिकेंद्रित राजकारणाची चुणूक दाखवून दिली. आता खासदार आणि मंत्री दोन्ही महत्त्वाची पदे सिन्नर तालुक्याला लाभल्याने जिल्ह्याच्या राजकारणात सिन्नर तालुका केंद्रबिंदू ठरल्यास आश्चर्य वाटू नये.
सिन्नरकरांनी साजरा केला आनंदोत्सव
सिन्नरच्या इतिहासात पहिल्यांदाच कॅबिनेट मंत्रिपद मिळाल्याने सिन्नरकरांनी जल्लोष साजरा केला. शहरातील छत्रपती शिवाजी चौकात भव्य स्क्रिन उभारून कोकाटे यांचा शपथविधी दाखविण्यात आला. शहर व तालुक्यात जोरदार फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी लाडू व पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला. अनेक कार्यकर्ते कोकाटे यांच्या शपथविधीसाठी नागपूरकडे रवाना झाले होते.