भाजपविरोधी सर्वपक्षीय सामीलकीचेच संकेत !

By किरण अग्रवाल | Published: October 13, 2019 01:53 AM2019-10-13T01:53:53+5:302019-10-13T01:57:42+5:30

ठिकठिकाणी परस्परांविरुद्ध झालेल्या बंडखोऱ्यांवरूनच नव्हे, तर इतरही अनेक कारणं-प्रसंगातून भाजप-शिवसेनेत ‘युती’ असूनही सुरू असलेली अंतस्थ धुसफूस लपून राहिलेली नाही. अशात निवडणूक रिंगणातील परपक्षीय उमेदवाराची भेट घेऊन त्यास शुभेच्छा दिल्या जात असतील तर त्यातून दुसºया, पर्यायी छुप्या राजकीय सामीलकीचेच संकेत घेता यावेत.

Signs of pro-BJP alliance! | भाजपविरोधी सर्वपक्षीय सामीलकीचेच संकेत !

भाजपविरोधी सर्वपक्षीय सामीलकीचेच संकेत !

Next
ठळक मुद्देअपक्ष उभे राहिलेल्या स्वकीयांची बंडखोरी रोखण्याचे सोडून परपक्षातील उमेदवाराची भेट घेण्यामागील गणित काय? भाजप-शिवसेना ‘युती’ तील परस्परांबद्दलच्या अविश्वासाची स्थिती संपुष्टात आली नसल्याचेच चित्र बंड शमविण्यात सेना नेतृत्वाला यश आलेले नाही

सारांश


राज्यातील विधानसभा निवडणुकीला भाजप-शिवसेना ‘युती’ने सामोरे जात असले तरी या उभय पक्षांतील परस्परांबद्दलच्या अविश्वासाची स्थिती संपुष्टात आली नसल्याचेच चित्र दिसून येते आहे. कारण तसे नसते तर ‘युती’चा आकडा वाढविण्याऐवजी वैयक्तिक वा विरोधकास साहाय्यभूत ठरू शकणारी पावले पडताना व आकडेमोड घडून येताना दिसली नसती.

निवडणुकीच्या प्रचाराला आता आठवडा उरला आहे, त्यामुळे दिवसेंदिवस प्रचाराचा माहौल तापू लागला आहे. जिल्ह्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवा नेते आदित्य ठाकरे, राष्टÑवादीचे नेते छगन भुजबळ, खासदार अमोल कोल्हे, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले आदींच्या सभा झाल्या असून, त्यात काश्मिरातील ३७० कलमापासून ते स्थानिक पातळीवरील कांदा व नार-पारच्या पाणीप्रश्नापर्यंतचा ऊहापोह घडून आला आहे. कॉँग्रेसने त्यांच्या काळात काय केले, हा प्रश्न जसा सत्ताधाऱ्यांकडून विचारला जातो आहे, तसाच भाजपने गेल्या ५ वर्षांत काय केले, असाही प्रश्न विरोधकांकडून केला जातो आहे. त्यामुळे प्रचारातल्या आरोप-प्रत्यारोपांचे गांभीर्य वाटेनासे झाले आहे. पण, दुसरीकडे यंदा बंडखोरांचे पीक अमाप असताना त्यांना दटावण्याऐवजी सांभाळून घेण्याचे व काही बाबतीत प्रोत्साहनाचीही भूमिका घेतली जाताना दिसून आल्याने आश्चर्य वाटून जाणे स्वाभाविक ठरले आहे.

विशेषत: नाशिक पश्चिम मतदारसंघात भाजप उमेदवार सीमा हिरे यांच्या विरोधात शिवसेनेचे विलास शिंदे अपक्ष म्हणून उभे आहेत. सिडकोतील साºया शिवसैनिकांचे त्यांना समर्थन असल्याचे उघडपणे बोलले जाते. पण त्यांच्याकडून ‘युतीधर्म’ धोक्यात आणला गेला असतानाही अद्याप त्यांचे बंड शमविण्यात सेना नेतृत्वाला यश आलेले दिसत नाही. उलट त्यांची बंडाळी रोखण्यासाठी खासदार संजय राऊत यांनी घेतलेल्या बैठकीनंतर ते अधिकच जोशात आलेले दिसत आहेत. म्हणजे, बैठकीत कान धरला गेला, की प्रोत्साहन दिले गेले असाच प्रश्न उपस्थित व्हावा. परिणामी आता याबाबतचा फैसला थेट उद्धव ठाकरे यांच्या कोर्टात गेला आहे.

महत्त्वाचे म्हणजे, स्वपक्षातील बंडाळी शमवता आलेली नसताना शिवसेना नेते राऊत हे भाजपतून बंडखोरी करीत राष्टÑवादीकडून निवडणूक रिंगणात उतरलेल्या बाळासाहेब सानप यांच्या भेटीस गेलेले व बंद दाराआड गुफ्तगू करताना दिसून आले. म्हणायला या भेटीला सदिच्छा भेट म्हटले जात असले तरी, ऐन निवडणूक काळात अशा भेटी घडतात तेव्हा त्यातून अप्रत्यक्षपणे काही संकेत प्रसृत झाल्यावाचून राहात नाहीत. मुळात, भाजपतून बंडखोरी केलेले सानप हे काही अपक्ष म्हणून उभे राहिलेले नाहीत. त्यांनी पर पक्षात प्रवेश केला आहे. त्यामुळे त्यांची बंडखोरी टाळण्याचा प्रयत्न म्हणून या भेटीकडे पाहता येऊ नये. शिवाय, ही भेट सहज वा अपघाताने घडलेली नाही. राऊत स्वत: सानपांकडे गेले. त्यामुळे त्यामागे निव्वळ सदिच्छेचा हेतू असणे शक्य नाही, आणि तसा असेल तर तेही आक्षेपार्ह ठरावे. कारण ‘युतीधर्म’ निभावत भाजप उमेदवारासाठी मते मागण्याचे सोडून परपक्षीयाला सदिच्छा दिल्या जाणार असतील, तर त्याही बंडखोरीतच मोडाव्यात.


थोडक्यात, ‘युती’त निर्भेळ व आलबेल स्थिती नाही हे यातून लक्षात यावे. सहयोगी पक्षापेक्षा आपला नंबर अगर आकडा वाढवतानाच परपक्षीयाशी स्रेह-सलोखा राखून उद्याच्या चर्चेसाठी दारे उघडी करून ठेवण्याचा प्रयत्न यामागे असण्याची शक्यता नाकारता येणारी नाही. याचाच अर्थ, वातावरण बदलते आहे किंवा बदलले जाऊ शकते. शिवसेना-भाजपमधील अंतस्थ स्थिती सुदृढ नसल्याचेच हे लक्षण म्हणता यावे. नांदगावमध्ये शिवसेना उमेदवारासमोर कायम असलेल्या भाजप नेत्याची व इगतपुरीमधील एका माजी आमदार कन्येचीही अपक्ष उमेदवारी तेच सांगून जाणारी आहे. हे असे केवळ नाशिक जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्टÑात घडले आहे. कुणी कुणाला थांबवायला, रोखायला तयार नाही. परस्पर हिशेब चुकते होत असतील तर होऊ द्या, अशी भूमिका बाळगली जाताना दिसत आहे. अशातून कॉँग्रेस आघाडीच्या उमेदवारांसाठी साहाय्यभूत स्थिती निर्माण होणे आश्चर्याचे ठरू नये. राष्टÑवादीच्या उमेदवारासोबत झालेल्या शिवसेना नेत्याच्या निवडणूकपूर्व सदिच्छा भेटीकडे त्याचदृष्टीने पाहता यावे.

Web Title: Signs of pro-BJP alliance!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.