कॉँग्रेसमध्ये फेरबदलाचे संकेत
By Admin | Updated: January 23, 2016 23:10 IST2016-01-23T23:09:31+5:302016-01-23T23:10:45+5:30
इच्छुकांचे लॉबिंग : शहराध्यक्षांना डच्चू

कॉँग्रेसमध्ये फेरबदलाचे संकेत
नाशिक : शहर व जिल्हा कॉँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची उचलबांगडी करून त्यांच्या जागी नव्या नेतृत्वाला संधी देण्याचे संकेत प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी दिल्यामुळे इच्छुकांची लॉबिंग सुरू झाली असून, त्यात आजी-माजी पदाधिकारीही आघाडीवर आहेत. येत्या आठवडाभरात नवीन नियुक्त्या होणार असल्याने हालचाली अधिक गतिमान होऊन एकमेकांवर कुरघोडीचे पूरेपूर प्रयत्न केले जात आहेत.
वर्षभरावर येऊन ठेपलेल्या महापालिका व जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांतर्गत फेरबदलाचे वारे जोरदार वाहू लागले आहेत. पक्ष विरोधी पक्षात असतानाही पाहिजे त्या प्रमाणात विद्यमान पक्ष पदाधिकाऱ्यांकडून सरकार विरोधी वातावरण निर्माण करण्यात अपयश येत असल्याचा ठपका ठेवण्यात आला असून, त्यातूनच पक्ष कार्यकर्त्यांमध्ये मरगळ आल्याचा निष्कर्ष पक्षश्रेष्ठींनी काढला आहे. नाशिक महापालिकेत पक्ष विरोधी पक्षात, तर जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी सोबत असल्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत पक्षाची ताकद वाढविण्यासाठी आत्तापासून तयारी करण्याचा भाग म्हणूनही या फेरबदलाकडे पाहिले जात आहे. नाशिक शहर कॉँग्रेसचे प्रभारी अध्यक्षपद शरद अहेर यांच्याकडे सोपविण्यात आले, नंतर तेच कायम अध्यक्ष राहतील असा दावा त्यांच्या समर्थकांकडून करण्यात येत आहे; परंतु ही बाब अन्य इच्छुकांना मान्य नाही. अहेर यांच्या काळात शहराची कार्यकारिणीदेखील होऊ शकलेली नाही, परिणामी कार्यकर्ते सैरभैर झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे शहराध्यक्षपदासाठी डॉ. शोभा बच्छाव, डॉ. हेमलता पाटील, शैलेश कुटे व शाहू खैरे यांच्या नावांची चर्चा केली जात आहे. त्यात खैरे यांना महापालिकेचे गटनेते पद देण्यात आल्याचा मुद्दा पुढे करून त्यांच्या नावाला पक्षांतर्गत विरोध झाला, तर कुटे व बच्छाव यांना पक्षाने एकदा संधी दिली असल्याची बाब डॉ. हेमलता पाटील यांनी पक्षश्रेष्ठींना पटवून दिली आहे. असे असले तरी कुटे, बच्छाव यांनीही जोरदार लॉबिंग केली आहे. (प्रतिनिधी)