Shri Ganaraya's immersion procession in procession | श्री गणरायाची विसर्जन मिरवणूक जल्लोषात
श्री गणरायाची विसर्जन मिरवणूक जल्लोषात

नाशिक : ढोल-ताशांचा गजर, लेजीमचा ठेका, पारंपरिक पेहरावांवर रंगीबेरंगी फेट्यांनी वाढवलेली शोभा आणि त्यात वरुणराजाने अलगदपणे सुरू केलेल्या जलाभिषेकात गणेशोत्सवाच्या मिरवणुकीस प्रारंभ झाला. उपनगरांमध्येही श्रींना भावपूर्ण निरोप देण्यात आला.
मुख्य विसर्जन मिरवणुकीला दुपारी १२.३०च्या सुमारास रिमझिम पावसातच प्रारंभ झाला. शहराच्या प्रथम नागरिक महापौर रंजना भानसी यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून औपचारिक प्रारंभ करण्यात आला. या विसर्जन मिरवणुकीप्रसंगी पालकमंत्री गिरीश महाजन, आमदार बाळासाहेब सानप, आमदार देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे, पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील, मनपा आयुक्त राधाकृष्ण गमे, वसंत गिते, विजय साने, लक्ष्मण सावजी, गजानन शेलार, हरिभाऊ लोणारी आदी मान्यवर उपस्थित होते. ढोल-ताशांच्या गजरात मान्यवरांनी धरलेला फेर आणि बालगोपाळांनी लेजीमच्या ठेक्यावर केलेल्या लयबद्ध पदन्यासाने लक्ष वेधून घेतले.
शहरात सर्वत्र बाप्पाला निरोप देण्यासाठी लगबग सकाळपासून दिसून येत होती. लाडक्या बाप्पांना निरोप दिला जात असताना वरुण राजानेदेखील गणरायावर जलाभिषेकाची संततधार धरल्याने कार्यकर्त्यांच्या उत्साहाला अधिकच बहर आला होता. विसर्जन मिरवणूक शांततेत पार पडावी, यासाठी पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस यंत्रणा प्रयत्न करीत होती. अखेरीस ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ असा भावपूर्ण निरोप देत गणरायाच्या मूर्तींचे विसर्जन करण्यात आले.
मानाच्या पाच गणरायांनंतर क्रमांक मिळवण्यासाठी लगबग
सार्वजनिक गणेशोत्सव मित्रमंडळाच्या अग्रभागी नाशिक महापालिका कर्मचारी गणेशोत्सव समितीचा गणपती आणि त्यापाठीमागे रविवार कारंजा मित्रमंडळ, भद्रकाली कारंजा मित्रमंडळाचा श्रीमंत साक्षी गणेश, गुलालवाडी व्यायामशाळा मित्रमंडळ, श्रीमान सत्यवादी मित्रमंडळाची भव्यमूर्ती, सूर्यप्रकाश नवप्रकाश मित्रमंडळाचा नाशिकचा राजा, सरदार चौक मित्रमंडळ, रोकडोबा मित्रमंडळ, मेन रोड येथील शिवसेवा मित्रमंडळ, शिवमुद्रा मित्रमंडळाचा मानाचा राजा, मुंबई नाका युवक मित्रमंडळ, जुने नाशिक दंडे हनुमान मित्रमंडळ, युनायटेड मित्रमंडळ, शनैश्चर युवक समिती, नेहरू चौक मित्रमंडळ, नवीन आडगाव नाका सांस्कृतिक कला, क्र ीडामंडळ, श्री गणेश मूकबधीर मित्रमंडळ, गजानन मित्रमंडळ, द्वारकामाई मित्रमंडळ सहभागी आहेत. विविध मंडळांकडून पारंपरिक मर्दानी खेळ सादर करण्यात आले.
पालकमंत्र्यांचे ढोलवादन
४विसर्जन मिरवणुकीच्या प्रारंभीच पालकमंत्री गिरीश महाजन यांनी केलेले ढोलवादन आणि धरलेल्या फेराने सर्वच राजकीय पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्येदेखील उत्साह संचारला. काही क्षणांसाठी ढोल वाजवत महाजन यांनी त्यांच्या ढोलवादन कौशल्याचा जणू प्रत्यय दिला, तर सहायक पोलीस आयुक्त मंगलसिंह सूर्यवंशी यांनी मिरवणुकीला प्रारंभ झाल्यानंतर काही क्षण नृत्यासह पिपाणीवादन करीत उपस्थितांची दाद मिळवली.
पेशवाई मिरवणूक लक्षवेधी
गुलालवाडी व्यायामशाळेच्या बालगोपाळांनी मिरवणुकीच्या प्रारंभापासून केलेल्या लयबद्ध पदन्यास आणि ढोलवादक युवतींच्या कसरतींना प्रेक्षकांकडून सर्वाधिक पसंती देण्यात येत होती. गुलालवाडीच्या बालकांचे लेजीम पाहण्यासाठी प्रेक्षक रस्त्याच्या दुतर्फा गर्दी करीत होते. बालकांनी दाखविलेल्या शिस्तबद्ध खेळाने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते. रविवार कारंजा मित्रमंडळाने शतकोत्तरी वर्षाच्या निमित्ताने पेशवाईच्या धर्तीवर गणरायाची मिरवणूक काढून नाशिककरांना आकर्षित केले. मिरवणुकीत हत्तींना बंदी असल्याने हुबेहूब फायबरचा हत्ती तयार करून त्यावर चांदीच्या गणरायाची मूर्ती विराजमान करण्यात आली आहे. छत्र चामर आणि पेशवाईप्रमाणे काढलेली मिरवणूक लक्ष वेधून घेत होती.

Web Title:  Shri Ganaraya's immersion procession in procession

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.