प्रकाशदिनाच्या पूर्वसंध्येला शोभायात्रा
By Admin | Updated: November 6, 2014 00:18 IST2014-11-06T00:13:34+5:302014-11-06T00:18:25+5:30
आज गुरू नानक जयंती : नाशिकरोडला मिरवणूक उत्साहात

प्रकाशदिनाच्या पूर्वसंध्येला शोभायात्रा
नाशिकरोड : शिखांचे पहिले गुरू गुरू नानक देवजी यांच्या प्रकाशदिनाच्या पूर्वसंध्येला सायंकाळी नाशिकरोड परिसरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली होती.
बिटको महाविद्यालयाशेजारील गुरुद्वारा येथून सायंकाळी फुलांनी सजविलेल्या रथातून गुरुग्रंथसाहिब पालखीची शोभायात्रा काढण्यात आली होती. शोभायात्रा दत्तमंदिर सिग्नल, मोटवानी रोड, सिंधी कॉलनी, बिटको पॉर्इंट, मुक्तिधाम, दत्तमंदिररोडमार्गे पुन्हा गुरुद्वारापर्यंत काढण्यात आली होती. शीख समाज बांधव व महिला शोभायात्रेचा मार्ग झाडून पाण्याचा सडा मारत होते. शोभायात्रेत पंजाब येथील पतीयालाचे बॅडपथक व पंजाबच्या आनंदपूरसाहिब येथील गतका पथक हे विशेष आर्कषण ठरले ढाल-तलावर, दांडपट्टा आदिंची प्रात्यक्षिके शीख जवानांनी दाखविली. तलवारधारी पंचप्यारेदेखील सहभागी झाले होते. शोभायात्रेत शम्न्मीशेट आनंद, किंटीशेट आनंद, सनी सलुजा, डोनूशेट रिक्की, रघुबीरसिंग सलूजा, मोहनसिंग सेटी, विकी सलूजा, सोनू बग्गा, बब्बुशेठ बिंद्रा, प्रिसिल लांबा आदिंसह शीख समाज बांधव व महिला सहभागी झाले होते.
गुरुनानक जयंती निमित्त गेल्या शनिवारपासून पहाटे शिख समाजबांधव निशानसाहब हाती घेऊन गुरुनानजीवरील भजन, किर्तन करत परिसरातून प्रभातफेरी काढत आहे. उद्या गुरुवारी गुरुनानक जयंती निमित्त गुरुद्वारात सुरु असलेल्या गुरुग्रंथ साहिबचा अखंड पाठाची समाप्ती किर्तन व महाआरतीने होईल. सकाळी निशानसाहिबवर नवे वस्त्र चढवून त्याची विधिवत सेवा केली जाईल. दुपारी महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)