शिंगवेला खड्ड्याने घेतला लहान मुलाचा बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2022 01:39 IST2022-07-13T01:39:04+5:302022-07-13T01:39:26+5:30
शिंगवे येथील रोहित कटारे या आठ वर्षीय लहान मुलाचा पुराच्या पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून मृत्यू झाला.

शिंगवेला खड्ड्याने घेतला लहान मुलाचा बळी
सायखेडा : शिंगवे येथील रोहित कटारे या आठ वर्षीय लहान मुलाचा पुराच्या पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून मृत्यू झाला.
शिंगवे गावाच्या लगत वीटभट्टीसाठी माती काढण्यासाठी उन्हाळ्यात खड्डा खोदला होता. अचानक पुराचे पाणी आले आणि त्यामुळे माती काढलेले खड्डे पाण्याने भरले. रस्ता आणि खड्डे एकच झाल्याने रस्ता लक्षात आला नाही. आठ वर्षीय रोहित घराजवळून कधी बाजूला रस्त्यावर गेला, हे लक्षात आले नाही. कुटुंबातील सर्वांनी त्याचा शोध घेतला. ग्रामपंचायतीने मुलगा हरवला आहे, दिसल्यास तत्काळ संपर्क साधावा, असे आवाहन सोशल मीडियाद्वारे केले होते. सगळीकडे शोधूनही मुलगा सापडत नसल्याने अखेर पाण्यात शोध घेण्यात आला. यावेळी अनेक तास उलटून गेल्याने रोहितचा मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसला. गावात ही वार्ता वाऱ्यासारखी पसरली. त्याच्या मृत्यूने सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे.