शिंदेंच्या शिवसेनेला नाशिकमध्ये पडणार खिंडार, माजी खासदार हेमंत गोडसेही भाजपच्या वाटेवर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2025 13:50 IST2025-07-15T13:44:07+5:302025-07-15T13:50:25+5:30

नाशिकमध्ये महायुतीतच शह-काटशहचे राजकारण, माजी खासदार हेमंत गोडसे हे शिवसेनेच्या माजी नगरसेवकांसह भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा स्थानिक राजकीय वर्तुळात रंगली आहे. 

Shinde's Shiv Sena will face a setback in Nashik; Former MP Hemant Godse also on the path to BJP? | शिंदेंच्या शिवसेनेला नाशिकमध्ये पडणार खिंडार, माजी खासदार हेमंत गोडसेही भाजपच्या वाटेवर?

शिंदेंच्या शिवसेनेला नाशिकमध्ये पडणार खिंडार, माजी खासदार हेमंत गोडसेही भाजपच्या वाटेवर?

Nashik Politics Shiv Sena: आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमुळे राज्यात पक्षांतराचे वारे सुरू झाले आहे. अनेक माजी आमदार, माजी खासदार आणि माजी मंत्री विरोधी पक्षातून सत्ताधारी पक्षात उड्या मारताना दिसत आहे. पण, नाशिकमधील एका राजकीय चर्चेने सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या गेल्या आहेत. कारण महायुतीतील मित्र पक्ष असलेल्या शिंदेंच्या शिवसेनेचे माजी खासदार हेमंत गोडसे हेच भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा जोरात सुरू आहे. पक्षातील काही माजी नगरसेवकासह ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे राजकीय वर्तुळात दबक्या आवाजात बोलले जात आहे. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

माजी खासदार हेमंत गोडसे हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा मागील दोन-तीन दिवसांपासून सुरू झाली आहे. तेच नव्हे तर त्यांच्याबरोबर पाच ते सहा शिवसेनेचे माजी नगरसेवकदेखील जाणार आहेत. त्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.

महायुतीत राजकारण?; नाशिकच्या राजकारणात चर्चा काय? 

शिंदेंच्या शिवसेनेतून जाणाऱ्यांची कारणे वेगवेगळी असली तरी महायुतीत भाजप- शिंदेंच्या शिवसेनेमध्ये शहकाटशहचे वातावरण रंगल्याचे दिसत आहे. 

महापालिका निवडणुकांमुळे सध्या उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि अन्य विरोधी गटांना गळती लागली आहे. अनेक माजी नगरसेवक आणि पदाधिकारी भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेत जाणार आहेत. ठाकरेंची शिवसेना पूर्णपणे रिकामी करण्याचे शिंदेंच्या शिवसेनेचे उद्दिष्ट आहे, असल्याची चर्चा आहे. 

वाचा >>"कमी बोला, जास्त काम करा"; पक्षातील नेत्यांना एकनाथ शिंदेंच्या कानपिचक्या, म्हणाले...

मात्र, दुसरीकडे भाजपकडे येणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे. त्यातच ठाकरेंच्या शिवसेनेतून शिंदेंच्या शिवसेनेकडे जाणारे डॉ. अपूर्व हिरे, सुधाकर बडगुजर यांच्यासह अनेकांना आपल्याकडे वळवण्यात आले आहे. आता मात्र, शिंदेंच्या शिवसेनेतूनच थेट भाजपत येत असून, भाजप त्यांचे सहर्ष स्वागत करीत आहे.

भुजबळांचा पराभव करून गोडसे बनले खासदार

शिवसेनेचे माजी खासदार हेमंत गोडसे हे सलग दोन वेळा नाशिक लोकसभा मतदारसंघातून निवडून आले. पहिल्यावेळी २०१४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार समीर भुजबळ यांचा, तर २०१९ मध्ये राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांचा त्यांनी पराभव केला. 

त्यानंतर शिवसेनेत फूट पडल्यनांतर सर्वप्रथम समर्थन शिंदेंच्या शिवसेनेचे करणाऱ्या खासदारांमध्ये हेमंत गोडसे होते. अर्थात मध्ये झालेल्या २०२४ झालेल्या लोकसभा निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांनी त्यांचा पराभव केला. 

आता ते संघटनेत सक्रिय असले तरी ते भाजपच्या वाटेवर असल्याचे वृत्त आहे. पक्षातील संघटनात्मक दुहीने ते नाराज असल्याचे सांगण्यात येत असले तरी काही व्यक्तिगत कारणांमुळे ते भाजपच्या मार्गावर असल्याचे वृत्त आहे. 

गोडसे यांनी मात्र याचा इन्कार केला आहे. महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग रचना घोषित झाल्यानंतर शिंदेसेनेकडून भाजपाकडे जाणाऱ्यांची संख्या वाढेल अशीदेखील शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या सर्वच पक्षांना प्रभागरचनेची प्रतीक्षा आहे.

हेमंत गोडसे भाजप प्रवेशाबद्दल काय बोलले?

शिवसेनेच्या माजी नगरसेवकासह हेमंत गोडसे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांवर त्यांनी स्वतः खुलासा केला आहे. ते म्हणाले, "मी भाजपत जाणार असल्याच्या चर्चा दोन-तीन दिवसांपासून असल्या तरी मी पक्षातच आहे."

Web Title: Shinde's Shiv Sena will face a setback in Nashik; Former MP Hemant Godse also on the path to BJP?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.