शरद पवार, छगन भुजबळ एकाचवेळी नाशकात; पहिली सभा, शक्तीप्रदर्शनाने वातावरण तापणार
By श्याम बागुल | Updated: July 7, 2023 19:33 IST2023-07-07T19:31:49+5:302023-07-07T19:33:27+5:30
दोन्ही गटांकडून शक्तिप्रदर्शनाची तयारी : पोलिस सतर्क

शरद पवार, छगन भुजबळ एकाचवेळी नाशकात; पहिली सभा, शक्तीप्रदर्शनाने वातावरण तापणार
नाशिक : राष्ट्रवादीच्या एका गटाच्या सत्तेतील सहभागानंतर राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार व मंत्रिपदाची शपथ घेतलेले छगन भुजबळ हे दोघेही नेते शनिवारी (दि.८) एकाच दिवशी नाशकात दाखल होत असून, दोघा नेत्यांच्या स्वागतासाठी दोन्ही गटांकडून शक्तिप्रदर्शनाची तयारी केली जात आहे. राष्ट्रवादी भवन ताब्यात घेण्यावरून दोन्ही गटांत झालेल्या राड्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याच्या दृष्टिकोनातून पोलिस बंदोबस्त कडक केला आहे. रविवारी (दि.२) अजित पवार, छगन भुजबळ यांच्यासह नऊ मंत्र्यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यातच अजित पवार यांनी राष्ट्रवादी पक्षावर दावा केल्यामुळे राष्ट्रवादीतच दोन गट पडले आहेत. त्यातून मंगळवारी (दि.४) राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्ष कार्यालय ताब्यात घेण्यावरून शरद पवार निष्ठावंत गट व अजित पवार, भुजबळ समर्थकांमध्ये जेारदार घोषणा युद्ध झाले होते. तासभर कार्यालयाच्या बाहेर राडा होऊन एकमेकांच्या विरोधात घोेषणाबाजीमुळे राजकीय तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर शहर व जिल्ह्यातील राष्ट्रवादी पक्षात संभ्रमावस्था असताना शरद पवार यांनी राज्यव्यापी दौऱ्याची सुरुवात नाशिक जिल्ह्यात छगन भुजबळ यांच्या येवला मतदार संघापासून करण्याचे ठरविले आहे.