विक्रेत्यांनी जागेवरच व्यवसाय करावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2018 00:48 IST2018-07-22T00:48:35+5:302018-07-22T00:48:51+5:30
राष्ट्रीय फेरीवाला झोनअंतर्गत महानगरपालिकेने नेमून दिलेल्या जागेवरच विक्रेत्यांनी व्यवसाय करावा. अन्यथा कारवाई सुरूच ठेवण्याचा इशारा विक्रेत्यांच्या बैठकीत मनपा प्रशासनाने दिला आहे.

विक्रेत्यांनी जागेवरच व्यवसाय करावा
सातपूर : राष्ट्रीय फेरीवाला झोनअंतर्गत महानगरपालिकेने नेमून दिलेल्या जागेवरच विक्रेत्यांनी व्यवसाय करावा. अन्यथा कारवाई सुरूच ठेवण्याचा इशारा विक्रेत्यांच्या बैठकीत मनपा प्रशासनाने दिला आहे. प्रभाग क्रमांक ९ मधील शिवाजीनगर आणि श्रमिकनगर येथील विक्रेत्यांवर महानगरपालिका प्रशासनाकडून वारंवार होणाऱ्या कारवाईमुळे मोठे नुकसान होत आहे. या कारवाईला कंटाळून या विक्रेत्यांनी स्थानिक नगरसेवकांकडे धाव घेतली होती. विक्रेत्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी शुक्रवारी सातपूर विभागीय कार्यालयात बैठक घेण्यात आली. या बैठकीस उपायुक्त रोहिदास बहिरम, विभागीय अधिकारी निर्मला गायकवाड, नगरसेवक दिनकर पाटील, रवींद्र धिवरे, तसेच अनिल भालेराव, दिनकर कंडेकर आदींसह विक्रेते उपस्थित होते. मनपाने दिलेली जागा व्यवसायासाठी उपयुक्त नसल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे, तर दिलेल्या जागेवरच व्यवसाय करावा, काही अडचणी असतील तर सोडविण्याचा प्रयत्न केला जाईल. मात्र विक्रेत्यांनी रस्त्यावरच व्यवसाय केला तर मात्र कठोर करवाई केली जाईल असे स्पष्ट निर्देश विक्रेत्यांना देण्यात आल्याची माहिती विभागीय अधिकारी निर्मला गायकवाड यांनी दिली आहे.
व्यावसायिकांना दोन दिवसांची मुदत
या बैठकीत मनपा प्रशासनाने दिलेल्या निर्देशानुसार बहुतांश विक्रेत्यांनी हॉकर्स झोनमध्ये व्यवसाय करण्यास सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. मात्र कार्बननाका परिसरातील जवळपास ५० विक्रेत्यांनी नकार दिल्याने या व्यावसायिकांना प्रशासनाने दोन दिवसांची मुदत दिली आहे. त्यानंतर कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल, असे प्रशासनाने सांगितले आहे.