भाजपा आमदारास धक्का; सीमा हिरे यांचे बंधू काँग्रेसमध्ये दाखल
By संजय पाठक | Updated: June 27, 2023 17:26 IST2023-06-27T17:25:17+5:302023-06-27T17:26:01+5:30
पाटील हे पहिल्यापासूनच काँग्रेस विचारसरणीचेच असल्याचे हिरे कुटुंबीयांकडून सांगण्यात आले.

भाजपा आमदारास धक्का; सीमा हिरे यांचे बंधू काँग्रेसमध्ये दाखल
नाशिक- आगामी लोकसभा निवडणुकीसाठी नाशिकमध्ये प्रचंड तयारी करणाऱ्या भाजपाला नाशिकमध्ये मोठा धक्का बसला आहे. नाशिक पश्चिम मतदारसंघाच्या आमदार सीमा हिरे यांचे सख्खे बंधू भालचंद्र पाटील यांनी आज मुंबई येथे काँग्रेसमध्ये प्रवेश केला. दरम्यान, पाटील हे पहिल्यापासूनच काँग्रेस विचारसरणीचेच असल्याचे हिरे कुटुंबीयांकडून सांगण्यात आले.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या आहेत. त्यामुळे भाजपाने जोरदार तयारी केली असून, संघटन बळकट करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. इतकेच नव्हे तर मतदारसंघ चांगल्या पद्धतीने बांधण्यासाठी बुधवारी (दि. २८) जुन्या एक हजार कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा देखील होत आहे. मात्र, एकीकडे ही तयारी सुरू असताना दुसरीकडे मात्र भाजपाच्या निष्ठावान हिरे कुटुंबाशी संंबंधित भालचंद्र पाटील यांनी काँग्रेस पक्षात सक्रिय होण्यासाठी प्रवेश केला आहे. या वेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, नाशिक शहर काँग्रेसचे अध्यक्ष ॲड. आकाश छाजेड, मुन्ना ठाकूर, गौरव सोनार, कल्पेश जेजुरकर, अल्तमेश शेख उपस्थित होते.