ध्वजारोहणाच्या मुहूर्तावर आखाड्यांचे शिक्कामोर्तब
By Admin | Updated: August 14, 2015 00:05 IST2015-08-14T00:04:54+5:302015-08-14T00:05:55+5:30
नियोजन निश्चित : सकाळी ६.३० ते ९.३० पर्यंत अत्यंत चांगला योग

ध्वजारोहणाच्या मुहूर्तावर आखाड्यांचे शिक्कामोर्तब
नाशिक : साधुग्राममधील तिन्ही आखाड्यांचे ध्वजारोहण १९ आॅगस्ट रोजी सकाळी ८ वाजून १० मिनिटांच्या मुहूर्तावर होणार असून, धार्मिक पूजाविधी व अन्य बाबींचे नियोजन निश्चित झाले आहे.
दिगंबर अनी, निर्वाणी अनी व निर्मोही अनी अशा तिन्ही प्रमुख आखाड्यांचे ध्वजारोहण दि. १९ रोजी साधुग्राममध्ये होईल. सकाळी ६.२५ ते ९.३० असा या सोहळ्यासाठीचा मुहूर्त आहे. साडेसहापासूनच धार्मिक विधींना सुरुवात होईल. प्रत्येक आखाड्यात सहा पुरोहितांमार्फत पूजाविधी होईल.
तिन्ही आखाड्यांत इष्टदेवतेची प्रतिष्ठापना केली जाईल. या सोहळ्याचे पौरोहित्य तिन्ही अनी आखाड्यांचे तीर्थोपाध्याय आचार्य वेदशास्त्र संपन्न घनपाठी दिनेश गायधनी आणि वेदशास्त्र संपन्न पुराणिक विनायक गायधनी करणार आहेत.
सकाळी ठीक ८ वाजून १० मिनिटांनी ध्वजारोहण केले जाईल. तिन्ही आखाड्यांचे एकापाठोपाठ ध्वजारोहण होणार आहे. ध्वज फडकल्यानंतर पेढे, मिठाई वाटून कुंभमेळ्याला प्रारंभ झाल्याचा आनंद व्यक्त केला जाईल. त्यानंतर साधुग्रामच्या प्रवेशद्वाराचा लोकार्पण सोहळा होणार आहे. आखाड्यांच्या ध्वजारोहणानंतर विविध खालशांचे ध्वजारोहण होणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. (प्रतिनिधी)