मनपा शाळेला आयएसओ प्रमाणपत्र
By Admin | Updated: October 16, 2016 23:35 IST2016-10-16T23:22:41+5:302016-10-16T23:35:47+5:30
मनपा शाळेला आयएसओ प्रमाणपत्र

मनपा शाळेला आयएसओ प्रमाणपत्र
नाशिक : पटसंख्या आणि शिक्षणाचा दर्जा यामुळे महापालिकेच्या शाळांवर वारंवार टीका होत असते. मात्र महानगरपालिकेच्या सावित्रीबाई फुले शाळा क्रमांक ७३ ला शैक्षणिक गुणवत्तेचे ‘आयएसओ ९००१ - २०१५’ मानांकन मिळाले आहे. शाळेत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध प्रकारचे शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येत आहेत. विशेष म्हणजे ही मुलींची शाळा आहे.
सावित्रीबाई फुले महानगरपालिका शाळा क्र . ७३ ही अंबड गावातील मुलींची शाळा. शाळेत शिक्षण घेणाऱ्या मुलींची संख्या ६३० शाळेचे भव्य पटांगण, उत्कृष्ट इमारत आहे. ज्ञानार्जनाबरोबर गरज होती ती आनंददायी शिक्षणाची. यासाठी शाळेत भौतिक सोई-सुविधा निर्माण करतानाच ज्ञान घेण्यासाठी पूरक वातावरण निर्मितीची. त्यामुळे येथील शिक्षकांनी आणि कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेऊन शाळेचे रूपडे पालटून टाकण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. या कामात सेवाभावी संस्था, देणगीदार आणि स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने सुविधा उभारल्या गेल्या. या उपक्र मांतर्गत शाळा परिसरात वृक्ष लागवड, परिसर सुशोभिकरण, इमारतीची रंगरंगोटी, बोलक्या भिंती निर्मिती, घोषवाक्य, संदेश, सुविचार, दिशादर्शक फलक, सेंद्रीय खतप्रकल्प, डिजीटल क्लासरूम, संगणक प्रशिक्षण, ई-लर्निंग, शिस्तबद्ध शालेय रेकॉर्ड, सूचना व कौतुक पेटी, स्वच्छता आणि टिप्पणी, शिक्षक ओळखपत्र, गणवेश, स्वच्छ - सुंदर वर्ग आणि परिसर, विद्यार्थ्यांसाठी वाचनालय यांसारख्या असंख्य सुविधा निर्माण करण्यात आल्या. या कार्यात नाशिक महानगरपालिकेच्या शिक्षण मंडळाचे सभापती संजय चव्हाण, विभागाचे प्रशासन अधिकारी नितीन उपासनी, नगरसेवक उत्तम दोंदे, शोभा फडोळ यांनी सहकार्य केल्याचे मुख्याध्यापकांनी सांगितले. (प्रतिनिधी)