शासकीय जागेवर अतिक्रमण केल्याप्रकरणी सरपंच पायउतार
By संदीप भालेराव | Updated: August 31, 2022 17:46 IST2022-08-31T17:46:15+5:302022-08-31T17:46:28+5:30
हिंगणवेढे येथील सरपंच राजू अर्जुन धात्रक यांच्या विरोधात सामाजिक कार्यकर्ते कृष्णा शांताराम नागरे यांनी अप्पर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे यांच्याकडे अतिक्रमण प्रकरणी तक्रार दाखल केली होती

शासकीय जागेवर अतिक्रमण केल्याप्रकरणी सरपंच पायउतार
नाशिक : शासकिय जागेत अतिक्रमण केल्याप्रकरणी हिंगणवेढे येथील सरपंचांना पायउतार व्हावे लागले. अपर जिल्हाधिकाऱ्यांनी याप्रकरणी आदेश काढले असून सरपंचपदासह त्यांचे सदस्यपदही काढून घेण्यात आले.
हिंगणवेढे येथील सरपंच राजू अर्जुन धात्रक यांच्या विरोधात सामाजिक कार्यकर्ते कृष्णा शांताराम नागरे यांनी अप्पर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे यांच्याकडे अतिक्रमण प्रकरणी तक्रार दाखल केली होती. याप्रकरणी झालेल्या सुनावणी नंतर नडे यांनी सरपंच राजू अर्जुन धात्रक यांच्यावर अपात्रतेची कारवाई केली. धात्रक यांनी हिंगणवेढे गावठाणातील शासकीय जागेवर अतिक्रमण करुन तीन गाळे बांधून त्याचा उपयोग सुरू केला होता. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम अन्वये नागरे यांनी अपर जिल्हाधिकाऱ्यांकडे विवाद अर्ज दाखल केलेला होता. त्यामध्ये शासकीय जागेवर अतिक्रमणाबाबत कागदोपत्री पुरावे दाखल केले होते. या विवादाबाबत दोन्ही पक्षकारांना आपले म्हणष मांडण्याची संधी देण्यात आली होती. याप्रकरणी प्राप्त पुरावे आणि युक्तीवाादानंतर नडे यांनी दि. २८ ऑगस्ट रोजी धत्राक यांच्याविरुद्ध निकाल दिला आहे.