चेकपोस्टवरील कर्मचाऱ्यांना स्टेट बॅँकेकडून सॅनिटायझर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2020 15:20 IST2020-04-10T15:17:17+5:302020-04-10T15:20:21+5:30
कोरोना विषाणू संसर्ग रोखण्याच्या उपयोजना अंतर्गत प्रशासनाने स्थापन केलेल्या नांदूरशिंगोटे येथील जिल्हा चेक पोस्टवर कार्यरत असणा-या अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी स्टेट बँक आॅफ इंडियाच्या सिन्नर शाखेच्या वतीने मास्क, सॅनिटायझर, स्प्रे पंप व विटामिन सीच्या गोळ्यांचे वाटप करण्यात आले.

चेकपोस्टवरील कर्मचाऱ्यांना स्टेट बॅँकेकडून सॅनिटायझर
सिन्नर : कोरोना विषाणू संसर्ग रोखण्याच्या उपयोजना अंतर्गत प्रशासनाने स्थापन केलेल्या नांदूरशिंगोटे येथील जिल्हा चेक पोस्टवर कार्यरत असणा-या अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी स्टेट बँक आॅफ इंडियाच्या सिन्नर शाखेच्या वतीने मास्क, सॅनिटायझर, स्प्रे पंप व विटामिन सीच्या गोळ्यांचे वाटप करण्यात आले.
पंतप्रधानांनी देशात २१ दिवसांचा लॉकडाउन जाहीर केल्यावर बाहेरून जिल्ह्यात येणा-या लोकांकडून कोरोना विषाणूचा संसर्ग वाढेल अशी शक्यता गृहीत धरून जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी नाशिकच्या सीमावर्ती भागात चेक पोस्ट सुरू केले आहेत. पोलीस, महसूल, ग्रामविकास व आरोग्य विभागाकडून संयुक्तपणे या चेक पोस्टचे संचालन करण्यात येत आहे. नाशिक-पुणे महामार्गावर नांदुरशिंगोटे येथे सुरू करण्यात आलेल्या चेकपोस्टवरील अधिकारी व कर्मचा-यांना त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी एसबीआयच्या सिन्नर शाखेकडून अत्यावश्यक किट उपलब्ध करून देण्यात आले. यात हँड सॅनिटायझर, मास्क, स्प्रे पंप, विटामिन सीच्या गोळ्यांचा समावेश आहे. चेक पोस्टवरील कर्मचा-यांना उन्हात उभे राहून जिल्ह्यात प्रवेश करणा-या व्यक्ती व वाहनांची तपासणी करावी लागते. अशावेळी त्यांची शारीरिक प्रतिकारक्षमता व्यवस्थित राहावी म्हणून विटामिन सीच्या गोळ्यांचा फायदा होणार आहे. तहसीलदार राहुल कोताडे, उपविभागीय पोलिस अधिकारी माधव रेड्डी, सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजीत गलांडे यांच्या उपस्थितीत या साहित्याचे वितरण करण्यात आले. एसबीआयचे शाखा व्यवस्थापक विकास कुलकर्णी, उपशाखा व्यवस्थापक संगीता पटवर्धन यांनी प्रातिनिधिक स्वरूपात उपस्थित राहून या साहित्याचे वितरण केले. तालुक्यातील सेवाभावी संस्था, मंडळे व व्यक्तिगत पातळीवर लोकांचे कोरोना लढ्यात सहभागी होणा-या सरकारी यंत्रणांना पाठबळ लाभत आहे. अशाच प्रकारचे सहकार्य पुढील काळात मिळावे अशी अपेक्षा तहसीलदार कोताडे यांनी यावेळी व्यक्त केली.