मानोरीत कावळ्यांच्या तावडीतून वाचविले साळुंकीच्या पिलाला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 00:43 IST2021-06-20T23:11:35+5:302021-06-21T00:43:56+5:30
मानोरी : एकदा नव्हे, तर दोनदा छोट्याशा जिवाला चोचीत पकडून पलायन करणाऱ्या कावळ्यांच्या तावडीतून दोघा तरुणांनी सुखरूप सुटका करून भूतदयेचे दर्शन घडविले.

मानोरीत कावळ्यांच्या तावडीतून वाचविले साळुंकीच्या पिलाला!
मानोरी : एकदा नव्हे, तर दोनदा छोट्याशा जिवाला चोचीत पकडून पलायन करणाऱ्या कावळ्यांच्या तावडीतून दोघा तरुणांनी सुखरूप सुटका करून भूतदयेचे दर्शन घडविले.
"काळ आला होता; पण वेळ आली नव्हती" या म्हणीचा प्रत्यय येवला तालुक्यातील मानोरी बुद्रुक येथील एका साळुंकीच्या चिमुकल्या पिलाच्या जीव वाचविताना आला. मानोरी बु. येथे सलून दुकानजवळ साळुंकी आपल्या पिल्लाला घरट्यात दाणे भरवत होती. अचानक चार ते पाच कावळ्यांनी या साळुंकीच्या घरट्यावर हल्ला चढवत पिल्लाला घरट्यातून बाहेर ओढत पलायन करण्याचा प्रयत्न
केला.
घरट्यातून पिल्लाला घेऊन कावळे साधारण ४०० ते ५०० फुटांपर्यंत गेले होते. ते दृश्य सलून दुकानजवळ बसलेल्या अमोल शेळके आणि सोपान बिडवे या दोन तरुणांनी पाहताच त्यांनी कावळ्यांना दगड मारण्याचा प्रयत्न केला. कावळे त्या चिमुकल्या पिल्लाला हवेत घेऊन सुमारे ४० ते ५० फुटावरून उडत असताना या तरुणांनी केलेल्या दगडफेकीमुळे कावळ्यांनी पिल्लाला उंचीवरून सोडून
दिले.
मात्र, सदर तरुण पिल्लाजवळ पोहोचेपर्यंत पुन्हा चार ते पाच कावळ्यांनी जमिनीवर पडलेल्या पिल्लावर हल्ला चढवत उचलून नेण्याचा प्रयत्न केला. मात्र तरुणांनी सतर्कता दाखवत पुन्हा कावळ्यांच्या घोळक्यावर दगडफेक केली. कावळे दुसऱ्यांदा पिल्लाला हवेत घेऊन जात असताना पुन्हा ३० ते ४० फुटावरून पिल्लू जमिनीवर पडले. दोनदा जमिनीवर पडल्यामुळे जखमी पिल्लाला उडता येत नव्हते.
प्रसंगावधान राखलेल्या अमोल शेळके आणि सोपान बिडवे या दोन तरुणांनी त्या पिल्लाला अलगद उचलून सलून दुकानात नेले. भयभीत झालेल्या त्या पिल्लाच्या पायातून रक्त वाहत होते. त्यास पाणी पाजले आणि दाणे खाऊ घातले. एक तासानंतर पिल्लाला त्याच्या घरट्यात सोडण्यात आले. अतिउंचावरून दोनदा कावळ्यांच्या तावडीतून जमिनीवर पडलेले पिल्लू केवळ दैव बलवत्तर होते म्हणून वाचविता आल्याचा आनंद संबंधित तरुणांनी व्यक्त केला.