आरटीई प्रवेशाची सोडत पुण्यातून जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2019 01:22 IST2019-04-09T01:22:13+5:302019-04-09T01:22:31+5:30
आर्थिक दुर्बल व मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिक्षणहक्क कायद्यांतर्गत (आरटीई) २५ टक्के राखीव जागांवर प्रवेशासाठी पहिली सोडत सोमवारी (दि.८) पुण्यातून जाहीर करण्यात आली आहे.

आरटीई प्रवेशाची सोडत पुण्यातून जाहीर
नाशिक : आर्थिक दुर्बल व मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिक्षणहक्क कायद्यांतर्गत (आरटीई) २५ टक्के राखीव जागांवर प्रवेशासाठी पहिली सोडत सोमवारी (दि.८) पुण्यातून जाहीर करण्यात आली आहे. राज्यभरातील आरटीई प्रवेशाच्या १ लाख १६ हजार ९२६ जागांची लॉटरी पद्धतीने प्रवेश निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. यात नाशिक जिल्ह्यातून प्राप्त झालेल्या १४ हजार ९९५ अर्जांचाही समावेश असून जिल्ह्यातील ४५७ शाळांमध्ये यंदा ५ हजार ७६४ जागांवर ही प्रवेशप्रक्रिया राबविली जाणार आहे.
दरवर्षी जिल्हा स्तरावर होणारी सोडत यंदा राज्यस्तरावर काढण्यात आली असून, संपूर्ण राज्यभरात ही प्रक्रिया एकाचवेळी राबविण्यात येत आहे. पुण्यात सोमवारी संपूर्ण राज्यभराची लॉटरी काढल्यानंतर बुधवारी (दि.१०) आरटीई प्रवेशासाठी अर्ज करणाऱ्या पालकांना त्यांच्या पाल्यांना सोडतीत संधी मिळाली किंवा कसे याविषयी मोबाइलवर मेसेज मिळणार आहे. त्याचप्रमाणे गुरुवारी (दि.११) शहरात इंदिरानगर, नाशिकरोड, गंगापूररोड व पंचवटी भागातील एका शाळेत निवड झालेल्या विद्यार्थ्यांची यादीही प्रदर्शित करण्यात येणार आहे. पालकांनी एसएमएस व याद्यांवर अवलंबून न राहता पडताळणी समितीकडे जाऊन प्रवेशाची कार्यवाही सुरू करावी, असे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे.
पालकांनी ज्या शाळेत लॉटरी लागली आहे त्या शाळेजवळच्याच पडताळणी केंद्रावर जाऊन पडताळणी करावी, सर्व कागदपत्रांच्या दोन प्रति तयार कराव्यात, त्यापैकी एक संच पडताळणी समितीककडे व दुसरा संच शाळेत सादर करावा यातील सर्व कागदपत्रं पडताळणी समितीकडून तपासून घ्यावीत, तसेच आपला आॅनलाइन प्रवेश झाल्याची पावती तथा अलॉटमेंट लेटर आणि प्रवेशाची कागदपत्र घेऊन दिलेल्या मुदतीत शाळेत जाऊन प्रवेश निश्चित करावा, असे आवाहनही शिक्षण विभागाने केले आहे.
मागील वर्षाच्या तुलनेत जागांमध्ये घट
नाशिक जिल्ह्यात मागील वर्षी ४६६ शाळांमध्ये सहा हजार ५८९ जागा उपलब्ध होत्या. त्यासाठी ११ हजार ११८ अर्ज आले होते. एकूण चार प्रवेश फेऱ्यांमध्ये ७ हजार १०८ बालकांची लॉटरी लागली. मात्र, त्यापैकी केवळ ४ हजार ६४६ विद्यार्थ्यांचाच प्रवेश होऊ शकला होता. जिल्ह्यातील ९ शाळांना २० टक्के अनुदान मिळाल्याने त्यांना आरटीई प्रवेशप्रक्रियेतून वगळण्यात आले असून, जागांची संख्या ५ हजार ७६४ वर आली आहे. त्यामुळे मागील वर्षांच्या तुलनेत यंदा जिल्हाभरात ८२५ जागा कमी झाल्या आहेत.