गणूर सोसायटीत ३९ लाखांचा अपहार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2018 23:49 IST2018-06-14T23:49:31+5:302018-06-14T23:49:31+5:30
चांदवड : तालुक्यातील गणूर विविध कार्यकारी सोसायटीत ३९ लाख १५ हजार ५०१ रुपयांच्या रकमेचा अपहार केल्याप्रकरणी तत्कालीन सभापती व लिपिक अशा दोघांना अटक करण्यात आली असून, त्यांना १६ जूनपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आली आहे.

गणूर सोसायटीत ३९ लाखांचा अपहार
चांदवड : तालुक्यातील गणूर विविध कार्यकारी सोसायटीत ३९ लाख १५ हजार ५०१ रुपयांच्या रकमेचा अपहार केल्याप्रकरणी तत्कालीन सभापती व लिपिक अशा दोघांना अटक करण्यात आली असून, त्यांना १६ जूनपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आली आहे.
या प्रकरणी तिघांवर चांदवड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणाचा तपास वरिष्ठांकडे सोपविल्यानंतर या प्रकरणी सोसायटीचे तत्कालीन सभापती सुधाकर शिंदे, लिपिक विनायक थेटे यांना अटक करण्यात आली असून, त्यांना चांदवड न्यायालयात उभे केले असता न्यायालयाने दि. १६ जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले, तर माजी सचिव धोंडीराम साठे यांनी अटकपूर्व जामीन घेतल्याचे समजते. या घटनेतील गणूर विविध कार्यकारी सोसायटीचे तत्कालीन सभापती सुधाकर शिंदे, माजी सचिव धोंडीराम साठे, लिपिक विनायक थेटे यांनी पतसंस्थेचे वित्तीय पदाधिकारी म्हणून कार्यरत असताना दि. १ एप्रिल २०१३ ते ३१ मार्च २०१६ या लेखापरीक्षण कालावधीत सोसायटीच्या दैनंदिन व्यवहारात गैरव्यवहार केल्याचे उघड झाले होते. या गैरव्यवहाराच्या चौकशीसाठी जिल्हा उपनिबंधक, जिल्हा विशेष लेखापरीक्षक डी. एन. काळे यांनी झालेल्या गैरव्यवहाराच्या फेरलेखापरीक्षणासाठी चांदवड तालुका लेखापरीक्षक म्हणून ज्योती घडोजे यांची नेमणूक केली होती. सोसायटीचे सभापती, सचिव, लिपिक यांनी संगनमताने गैरव्यवहार करीत जवळपास ३९ लाख रुपयांच्या रकमेचा अपहार केल्याची फिर्याद लेखापरीक्षक ज्योती घडोजे यांनंी चांदवड पोलीस स्टेशनला दिली होती. या तिघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस निरीक्षक अनंत मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली कैलास चौधरी तपास करीत होते. यानंतर विशेष शाखेकडे हा तपास दिल्याने विशेष शाखेच्या पथकाने शिंदे व थेटे यांना अटक करून त्यांना पोलीस कोठडी मिळविली आहे.लेखापरीक्षकांचा ठपकालेखापरीक्षक घडोजे यांनी दि. १ एप्रिल २०१३ ते ३१ मार्च २०१६ या कालावधीत सोसायटीच्या दैनंदिन व्यवहाराची सखोल चौकशी केली. या चौकशीत सोसायटीचे तत्कालीन सभापती सुधाकर शिंदे, माजी सचिव धोंडीराम साठे, लिपिक विनायक थेटे यांनी संस्थेत जमा होणाऱ्या रकमा बॅँकेत भरणा न करता स्वत:च्या हितासाठी वापरल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.