हज यात्रेच्या बहाण्याने पावणेचार कोटींचा गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:18 IST2021-08-15T04:18:21+5:302021-08-15T04:18:21+5:30
नाशिक : हज यात्रेच्या बहाण्याने २३ यात्रकरूंना जवळपास पावणेचार कोटींचा गंडा घालणाऱ्या जेहान इंटरनॅशनल टुर्स अॅण्ड ट्रॅव्हल्सच्या संचालकाविरुध्द अखेर ...

हज यात्रेच्या बहाण्याने पावणेचार कोटींचा गंडा
नाशिक : हज यात्रेच्या बहाण्याने २३ यात्रकरूंना जवळपास पावणेचार कोटींचा गंडा घालणाऱ्या जेहान इंटरनॅशनल टुर्स अॅण्ड ट्रॅव्हल्सच्या संचालकाविरुध्द अखेर मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात तक्रारदारांची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त होत असून फसवणुकीच्या रकमेचा आकडाही वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मतिन अजिज अहमद मनियार ऊर्फ कादरी (रा. रहेनुमा स्कूल, वडाळा रोड) असे संशयित ट्रॅव्हल्स संचालकाचे नाव आहे. याप्रकरणी मुजम्मील युसूफ शेख (रा.मिरजनगर, नागजी चौक) यांनी तक्रार दाखल केली आहे. पवित्र हज आणि उमराह या धार्मिक स्थळांच्या यात्रेसाठी स्वस्तात यात्रेचे आमिष दाखवून संशयिताने यात्रेकरूंची फसवणूक केली आहे. वडाळा रोड येथील रहेनुमा स्कूल परिसरात ऑफिस थाटून त्याने हा उद्योग केला असून संशयिताच्या आमिषाला बळी पडून २०१४ मध्ये तक्रारदार शेख यांनी त्याच्याशी संपर्क केला होता. यावेळी स्वस्तातील पॅकेज उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देण्यात आल्याने तक्रारदार शेख यांनी आपल्या नातेवाइकांसह आप्तेष्टांनाही या योजनेत भाग घेण्यास प्रवृत्त केले. शेख यांच्या माध्यमातून तब्बल ३ कोटी ७१ लाख ५८ हजार ४०० रुपयांची तसेच नसरीबाद येथील यात्रेसाठी २३ यात्रेकरूंनी १ लाख १९ हजार रुपयांची बुकिंग देण्यात आली. ही रक्कम रोख, धनादेश आणि ऑनलाइन माध्यमातून संशयिताने स्वीकारली होती. मात्र २०१८ पर्यंत संशयिताने भाविकांच्या यात्रेची व्यवस्था केली नाही. चार वर्षे उलटूनही यात्रा प्रवासाचे विमान तिकीट अथवा पासपोर्ट आणि तत्सम कामे मार्गी न लावल्याने फसवणुकीचा हा प्रकार यात्रेकरूंच्या लक्षात आला. याच काळात संशयितावर वेगवेगळ्या ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले असून, संशयिताने गाशा गुंडाळल्याने शेख यांनी पोलिसांत धाव घेतली होती. मात्र पोलिसांकडूनही या प्रकरणात दखल घेतली गेली नसल्याने अखेर मुज्जमल शेख यांनी न्यायालयात दाद मागितली होती. न्यायालयाने मुंबई नाका पोलिसांना गुन्हा दाखल करून घेण्याचे आदेश दिले असून त्यानुसार पोलिसांकडून शुक्रवारी (दि.१३) मतिन अजिज याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.