रस्ते दुरुस्ती-देखभालीवर २४ कोटी रुपये खर्चाचा घाट
By Admin | Updated: August 6, 2015 00:14 IST2015-08-06T00:11:25+5:302015-08-06T00:14:06+5:30
सेनेचा आरोप : आयुक्तांशी करणार चर्चा

रस्ते दुरुस्ती-देखभालीवर २४ कोटी रुपये खर्चाचा घाट
नाशिक : शहरात सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर रस्त्यांचे नव्याने डांबरीकरण झाल्यानंतर आणि आता पावसाळा निम्म्यावर येऊन ठेपल्यानंतर महापालिका प्रशासनाकडून रस्ते दुरुस्ती-देखभालीच्या नावाखाली सुमारे २४ कोटी रुपये खर्चाचा घाट घातला असल्याचा आरोप शिवसेनेचे गटनेते व महानगरप्रमुख अजय बोरस्ते यांनी केला आहे. याप्रकरणी आयुक्तांशी चर्चा करणार असून स्थायी समितीवरही प्रस्तावाला विरोध करणार असल्याचे बोरस्ते यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
पावसाळा निम्म्यावर येऊन ठेपल्यानंतर प्रशासनाने रस्ते दुरुस्ती व देखभाली संदर्भातील सुमारे २४ कोटी रुपये खर्चाचा प्रस्ताव गुरुवारी (दि.६) होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत ठेवला आहे. या प्रस्तावानुसार पूर्व विभागासाठी ५ कोटी ३२ लाख, पंचवटी - ३ कोटी ६५ लाख, नाशिकरोड - ३ कोटी ७७ लाख, सिडको - ३ कोटी ९६ लाख, सातपूर - ४ कोटी ६ लाख आणि पश्चिम विभागासाठी ३ कोटी ४० लाख रुपये खर्चाला मंजुरी घेतली जाणार आहे. याबाबत बोरस्ते यांनी सांगितले, सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर शहरातील बव्हंशी रस्त्यांचे डांबरीकरण झालेले आहे तर बरेच रस्ते नव्याने तयार करण्यात आले आहेत; मात्र रस्ते दुरुस्ती व देखभालीच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव प्रशासनाकडून ठेवण्यात आला आहे. वास्तविक रस्ता तयार झाल्यानंतर तीन वर्षे त्याच्या देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी संबंधित कंत्राटदाराची असते. त्यामुळे सदर रस्त्यांचा दर्जा नीट तपासला गेला किंवा नाही याबाबत शंका निर्माण होते.
प्रशासनाने संबंधित कंत्राटदारांना नोटीसा पाठवून त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे. प्रशासनाने यापूर्वी कोणत्या रस्त्यांवर किती खर्च केला याबाबतची माहिती दिली पाहिजे. या प्रस्तावाबद्दल आयुक्तांशी चर्चा केली जाणार असून स्थायीच्या बैठकीतही पक्षाचे सदस्य विरोध दर्शविणार असल्याचे बोरस्ते यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)