Rohit Pawar's footsteps trembled at the festival of mountains of Kalvan | कळवणच्या डोंगऱ्या देव उत्सवात थिरकली रोहित पवार यांची पावले

कळवणच्या डोंगऱ्या देव उत्सवात थिरकली रोहित पवार यांची पावले

ठळक मुद्दे नांदुरी येथे आदिवासी बांधवांचा पारंपरिक डोंगऱ्या देव उत्सव

कळवण : आदिवासी परंपरेत महत्त्वपूर्ण गणल्या जाणाऱ्या डोंगऱ्या देव उत्सवातील आदिवासी नृत्याने आजवर भल्याभल्यांना भुरळ घातलेली आहे. कर्णमधुर संगीत आणि काळजाचा ठोका चुकवणारा लयबद्ध ठेका पाहून आमदार रोहित पवार यांचीही पावले अशा वेळी थिरकली नसती तर नवलच !

त्याचे झाले असे की, रविवार (दि.२७) रोजी नांदुरी येथे आदिवासी बांधवांचा पारंपरिक डोंगऱ्या देव उत्सव पार पडणार होता. या उत्सवास हजेरी लावण्यासाठी कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांना आमंत्रण देण्यात आले होते. त्यानुसार नाशिकहून सप्तश्रृंगी देवीच्या दर्शनाला जाताना आमदार पवार या उत्सवात सहभागी झाले. यावेळी स्थानिक आमदार नितीन पवार यांच्याकडून आदिवासी सांस्कृतिक कार्यक्रमांची माहिती घेत त्यांनी आदिवासी बांधवांबरोबर खुळखुळ्याची काठी घेऊन नृत्यही केले. रोहित पवार यांचा यातील सहभाग पाहता विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवाळ, आमदार हिरामण खोसकर हेदेखील नृत्यात सहभागी झाले. शासनस्तरावरून या कार्यक्रमांसाठी आर्थिक तरतूद व्हावी अशी अपेक्षा आमदार रोहित पवार यांनी याप्रसंगी बोलताना व्यक्त केली.

नंदुरबारसह नाशिक जिल्ह्यातल्या सुरगाणा, चिंचपाडा, हट्टी, कळवण, पेठ, दिंडोरी, बागलाण, त्र्यंबकेश्वर या आदिवासीबहुल भागांत डोंगऱ्या देव उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. निसर्गपूजक असलेला आदिवासी समाज डोंगर, पर्वत, वृक्ष, तसेच पंचमहाभूतांचे नागदेव, वाघदेव, घोरपड यांना देव मानून त्यांची दरवर्षी पूजा करतात. या उत्सवात कन्सारा माता आणि उन्हाबाळाचे गाणे म्हणून घुंगरू काठी, बांबूंचा टापरा, डफडी अशा वाद्यांच्या तालावर पावरी सुरांच्या आवाजात ठेका धरतात.

Web Title: Rohit Pawar's footsteps trembled at the festival of mountains of Kalvan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.