निफाड तालुक्यातील ५० किलोमीटरचे रस्ते शासनाकडे वर्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2020 18:45 IST2020-06-17T18:45:18+5:302020-06-17T18:45:39+5:30
अनेक वर्षांपासून या रस्त्यांची देखभाल-दुरुस्ती जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडून केली जात होती; परंतु गेल्या काही वर्षांपासून या रस्त्यांची अतिशय दयनीय अवस्था झाली

निफाड तालुक्यातील ५० किलोमीटरचे रस्ते शासनाकडे वर्ग
लोकमत न्युज नेटवर्क
नाशिक : निफाड तालुक्यातील गाव रस्त्यांची देखभाल-दुरुस्ती करण्यासाठी जिल्हा परिषदेची यंत्रणा अपुरी पडत असल्याने सुमारे ५० किलोमीटरचे रस्ते सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यास जिल्हा परिषदेने मान्यता दिली आहे.
सदरचे रस्ते सध्या जिल्हा परिषदेच्या मालकीची असून, शासन दरबारी ते ग्रामीण मार्ग आहेत. त्यात प्रामुख्याने रौळस-देवपूर-पंचकेश्वर रस्ता, नांदुर्डी -उगाव, थेटाळे, गोरठाण वारी-रानवड, ब्राह्मणगाव-वनस रस्ता, थेटाळे-कोटमगाव, कोटमगाव ते पिंपळस या रस्त्यांचा समावेश आहे. अनेक वर्षांपासून या रस्त्यांची देखभाल-दुरुस्ती जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडून केली जात होती; परंतु गेल्या काही वर्षांपासून या रस्त्यांची अतिशय दयनीय अवस्था झाली असून, त्याच्या देखभाल-दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध होत नसल्याची वस्तुस्थिती आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांची आजही अशीच अवस्था असून, आमदार, खासदारांच्या विकास निधीतून या रस्त्यांना निधी मिळाला तरच त्यांची दुरुस्ती केली जाते. या रस्त्यांची होणारी हेळसांड पाहता, सार्वजनिक बांधकाम खात्याकडे सदर रस्ते वर्ग केल्यास त्याची नियमित दुरुस्ती केली जाण्याची शक्यता आहे. परंतु हे रस्ते जिल्हा परिषदेच्या मालकीचे असल्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाला इच्छा असूनही त्याची देखभाल-दुरुस्ती करणे शक्य होत नसल्याचे पाहून आमदार दिलीप बनकर यांनी जिल्हा परिषदेला पत्र देऊन सदर रस्ते सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्याची विनंती केली. त्याला जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली आहे.