गंगागोदावरी मंदिरात दर्शनासाठी रीघ
By Admin | Updated: July 27, 2015 00:47 IST2015-07-27T00:47:35+5:302015-07-27T00:47:58+5:30
कपिला संगमावरही गर्दी : स्नानाची साधली पर्वणी; साधू महाराजांनाही दर्शन

गंगागोदावरी मंदिरात दर्शनासाठी रीघ
नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त पुरोहित संघाचे ध्वजारोहण झाल्यानंतर आता नाशकात येणाऱ्या भाविकांच्या गर्दीत दिवसेंदिवस वाढ होत असून, गोदाघाट, तपोवन, साधुग्राम परिसरात मोठ्या प्रमाणावर गर्दी दिसत आहे. विशेषत: रविवारच्या सुटीची पर्वणी साधून रामकुंडावर स्नान केल्यानंतर केवळ सिंहस्थात उघडणाऱ्या गंगागोदावरी मंदिरात दर्शनासाठी भाविकांची रांग लागलेली होती.
गोदावरीला दक्षिणेची गंगा असून, गंगेची ज्येष्ठ भगिनी आहे. त्यामुळे सिंहस्थ कुंभमेळ्याच्या काळात गंगा आपल्या ज्येष्ठ भगिनी गोदावरीला भेटण्यासाठी येते अशी श्रद्धा आहे. या गंगागोदावरीचे गोदाघाटावर रामकुंडानजीक अत्यंत प्राचीन मंदिर असून, भारतातील ते एकमेव मंदिर आहे. तसेच दर बारा वर्षांनी भाविकांना दर्शनासाठी खुले होत असल्याने या ठिकाणी राज्यातील तसेच परराज्यातील भाविकांची गर्दी दिसून येते. शनिवारी आणि रविवारी याठिकाणी आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आदि राज्यातील तसेच मराठवाडा, खान्देशमधील भाविकांची लक्षणीय उपस्थिती होते.
दरम्यान, साधुग्राममधील विविध आखाड्यांतदेखील साधुमहंतांच्या दर्शनासाठी गर्दी होऊ लागली आहे. तपोवनातील कपिल संगम येथेही भाविक आणि पर्यटक मोठ्या प्रमाणावर आलेले होते. (प्रतिनिधी)