रेव्ह पार्टी अभिनेत्री हीना पांचालच्या अंगलट!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:17 IST2021-07-07T04:17:49+5:302021-07-07T04:17:49+5:30
नाशिक जिल्ह्यातील निसर्गरम्य ठिकाण आणि सर्वाधिक मुसळधार पावसाचा तालुका म्हणून ओळख असलेल्या इगतपुरीमध्ये मुंबईतील व्यावसायिक संशयित पीयूष सेठिया यांच्या ...

रेव्ह पार्टी अभिनेत्री हीना पांचालच्या अंगलट!
नाशिक जिल्ह्यातील निसर्गरम्य ठिकाण आणि सर्वाधिक मुसळधार पावसाचा तालुका म्हणून ओळख असलेल्या इगतपुरीमध्ये मुंबईतील व्यावसायिक संशयित पीयूष सेठिया यांच्या वाढदिवसानिमित्त स्काय ताज, स्काय लगून या दोन बंगल्यात हायप्रोफाईल हवाईयन रेव्ह पार्टी शुक्रवारी आयोजित करण्यात आली होती. याबाबतची कुणकुण पोलिसांना लागल्याने शनिवारी मध्यरात्री पोलिसांनी या बंगल्यांवर छापा मारला. या ठिकाणी हुक्का, गांजा, मद्यासह चरस, कोकेनसारखे अंमली पदार्थांचे सेवनही करण्यात आल्याचे पुरावे पोलिसांच्या हाती लागले. तसेच ड्रग्ज पुरविणारा नायजेरियन उमाही पीटर यालाही पोलिसांनी साकीनाका येथून अटक केली. त्याच्याविरुद्ध यापूर्वीही काशीमिरा पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ कायद्यान्वये गुन्हा दाखल आहे. दरम्यान, या पार्टीसाठी ड्रग्ज पुरविणारे दोन संशयित अद्यापही फरार असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. दरम्यान, हीनासह २० संशयितांविरुद्ध पोलिसांनी सुरुवातीला कोटपा, दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यात न्यायालयाने या सर्वांना सात दिवसाची पोलीस काेठडी सुनावली होती. दरम्यान, रात्री उशिरापर्यंत हीनासह २० संशयितांविरुद्ध गुंगीकार औषधी द्रव्य व मन:प्रभावित पदार्थ अधिनियमाच्या (एनडीपीएस) विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. या गुन्ह्यात एकूण संशयित आरोपींची संख्या आता २५ वर पोहचली आहे.
--इन्फो---
‘अंमली पदार्थ सेवनाचा तपासाकरिता हवा ताबा’
सोमवारी पोलिसांनी पुन्हा हीनासह अन्य संशयितांना न्यायालयापुढे उभे केले असता, न्यायालयाने या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी मंजूर केली. मात्र सरकारी पक्षाकडून हीनासह २० संशयितांचा ताबा अंमली पदार्थ सेवनप्रकरणी पुढील तपास करावयाचा असल्याने मागितला गेला. न्यायालयाने सरकार पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरत स्थानिक गुन्हे शाखेकडे २० संशयितांचा ताबा वर्ग केला.
---इन्फो---
हीना आज पुन्हा न्यायालयात!
स्थानिक गुन्हे शाखेकडून एनडीपीएसच्या गुन्ह्यात अटक दाखविण्यात आलेल्या हीना पांचालसह २० संशयितांना आज मंगळवारी पुन्हा इगतपुरीच्या न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. तसेच एनडीपीएसच्या गुन्ह्यातील संशयित पीयूष सेठिया, उमाही पीटर, हर्ष शहा, नीरज सुराणा यांचीही नऊ दिवसाची पोलीस कोठडीची मुदत संपत असल्याने, त्यांनाही न्यायालयात हजर केले जाणार आहे. पीटर याचे दोन साथीदार अद्यापही फरार असून, त्यांचाही ड्रग्ज पुरविण्यामध्ये सहभाग असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे.
050721\05nsk_48_05072021_13.jpg~050721\05nsk_49_05072021_13.jpg
अटक करण्यात आलेली हीना पांचाल~अटक करण्यात आलेली हीना पांचाल