प्रतिबंध : आखाडे, खालसे, मंदिरांत शूटिंगला मनाई‘
By Admin | Updated: August 7, 2015 01:12 IST2015-08-07T01:05:13+5:302015-08-07T01:12:29+5:30
पोलीस वॉच’

प्रतिबंध : आखाडे, खालसे, मंदिरांत शूटिंगला मनाई‘
नाशिक : गुरुपौर्णिमेनंतर साधुग्राम गजबजू लागले असतानाच गर्दीचा फायदा घेत या ठिकाणी चोऱ्यांचे प्रमाणही वाढले आहे. दोन दिवसांपूर्वीच एका खालशात मोठी चोरी होऊन लाखो रुपयांचा ऐवज लंपास झाला होता. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी गस्त वाढवून बंदोबस्त अधिक कडक करीत संशयास्पदरीत्या फिरणाऱ्या युवकांवर आणि अनोळखी वाटणाऱ्या व्यक्तींच्या हालचालींवर करडी नजर ठेवली आहे. तसेच विविध आखाडे, खालसे आणि मंदिरांमध्ये छोटे कॅमेरे, मोबाइल आदिंद्वारे विनाकारण शूटिंग करणाऱ्यांवर प्रतिबंध घालण्यात आला आहे.
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरासह पंचवटी परिसर, रामकुंड, गोदाघाट आणि तपोवन भागात बाहेरगावाहून येणाऱ्या भाविक आणि पर्यटकांचा ओघ दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यातच साधुग्राममध्ये येणारे साधू-महंत आणि त्यांचा शिष्य परिवार हा देशभरातून आला असल्याने गर्दीचा फायदा घेत भुरट्या चोऱ्याबरोबर लाखोंचा ऐवज चोरून पसार होण्याच्या घटना घडत आहेत. गेल्या शनिवारी (दि.१) एका खालशामध्ये रात्रीच्या वेळी चोरट्यांनी लॅपटॉप, मोबाइलसह रोख रक्कम लंपास केली तर रविवारी कपिलसंगम परिसरात आंध्र प्रदेशातील एका महिलेच्या पर्समधील ६० हजार रुपये लांबविले. त्याशिवाय रोजच छोट्यामोठ्या चोरीचे प्रकार तपोवन आणि साधुग्राम परिसरात घडत असल्याने पोलिसांसमोर आव्हान उभे राहिले आहे. या वाढत्या चोरी प्रकाराला पायबंद घालण्यासाठी पोलिसांनी ठिकठिकाणी नाकेबंदी केली असून, रात्रीची गस्त वाढविली आहे. (प्रतिनिधी)किमती वस्तू सांभाळा
साधुग्राममध्ये दिवसेंदिवस वाढणारी गर्दी लक्षात घेता पोलिसांकडून अनेक खबरदारीचे उपाय केले जात आहेत. साधुग्राम परिसरातील सर्व पोलीस चौक्यांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले असून, सीसीटीव्ही कॅमेरा आणि साध्या वेशातील पोलीस यांच्या माध्यमातून चोरट्यांवर नजर ठेवण्यात येत आहे. तसेच महिला पोलीस आणि गृहरक्षक दलाची महिलांची तुकडी संशयास्पद फिरणाऱ्या महिलांवर लक्ष ठेवून आहे. याशिवाय आखाडे आणि खालशांमधील साधू-महंतांना त्यांच्या तंबूमधील किमती व मौल्यवान वस्तू व्यवस्थित सांभाळण्याच्या सूचना दिल्या असून, भाविकांनादेखील ठिकठिकाणी लावलेल्या ध्वनिक्षेपकांवरून गर्दीत आपापला किमती ऐवज व बॅगा सांभाळण्याचे आवाहन करण्यात येत आहे.